गुजरातेत चोरीच्या संशयावरून दलिताची हत्या
राजकोट – गुजरातमध्ये राजकोट जिल्ह्यात एका 35 वर्षीय दलित इसमाची चोरीच्या संशयावरून हत्या करण्यात आली. या इसमाला फटके मारून बेदम मारहाण करण्यात आल्याने तो मरण पावला. या मारहाणीचा एक व्हिडीओही सोशल मिडीयावर प्रसृत झाल्याने मोठीच खळबळ माजली आहे. व्हिडीओ मध्ये संबंधीत इसमाला मारहाण करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली असून अन्यही तिघांना या प्रकरणात ताब्यात घेण्यात आले आहे.
मृत दलित इसमाचे नाव मुकेश विनया असे असून तो कचरा गोळा करण्याचे काम करतो. या जिल्ह्यातील शपर गावा जवळ रडाडिया इंडस्ट्रीजच्या कंपाऊंड जवळ या इसमाला काठीने बेदम मारहाण करण्यात आली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पत्नीने पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी तातडीने हालचाल करून या पाच जणांना ताब्यात घेतले आहे. या मारहाणीचा प्रसृत झालेला व्हिडीओ अत्यंत क्रुर आहे. त्यातून लोकांमध्ये तीव्र प्रतिक्रीया उमटली आहे.