गुजरातमधील प्लॅस्टिक पिशव्यांच्या अवैध वाहतुकीवर धाड

- प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई : 5 वाहने पकडण्यात पथकाला यश
मुंबई – महाराष्ट्रात प्लॅस्टिकबंदी असतानाही गुजरातमधून रोज अवैधपणे प्लास्टिक पिशव्या येत आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळाने याची गंभीर दखल घेत नुकत्याच अशा अवैध वाहतूकीवर धाड टाकून मोठ्या प्रमाणात माल जप्त केला आहे. या सर्वांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली.
मंत्रालयात आज पत्रकारांशी बोलताना रामदास कदम यांनी ही माहिती दिली. पर्यावरणाचा गंभीर प्रश्न होऊ नये यासाठी राज्यात प्लॅस्टिकच्या उत्पादनापासून ते वापरापर्यंत बंदी घालण्यात आली. मात्र शेजारच्याच गुजरात राज्यातून मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक बॅग येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार भरारी पथकाने महाराष्ट्र, गुजरातच्या सीमेलगत डहाणू तालुक्यातील चारोटी टोलनाक्यावर सापळा लावला. तेव्हा 9 वाहने भरून अवैध माल येत असल्याचे आढळून आले. त्यापैकी 5 वाहने पकडण्यात पथकाला यश आले. हा माल मुंबईतल्या पश्चिम उपनगरातील मालाड, कांदिवली परिसरातील व्यापाऱ्यांना पुरविण्यात येणार होता. यापुढेही ही कारवाई अशीच सुरू राहणार असल्याचा इशारा कदम यांनी दिला.
“मन की बात’पेक्षा वास्तवाकडे लक्ष द्या…
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे “मन की बात’मधून प्लॅस्टिक बंदीचा संदेश देत असतात. मात्र प्रत्यक्षात त्यांच्याच गुजरातमधून मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिकचा माल महाष्ट्रात येत असल्याने पंतप्रधानांनी याकडेही लक्ष द्यावे, असे रामदास कदम म्हणाले. प्लॅस्टिकबंदीमुळे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लोक बेरोजगार झाले, असा गवगवा केला जातो. मात्र प्रत्यक्षात तशी परिस्थिती नाही. महाराष्ट्रात प्लॅस्टिक पिशव्यांचा 80 ते 90 टक्के पुरवठा हा गुजरातमधूनच होत होता. महाराष्ट्रात जे उद्योग होते ते अगदीच किरकोळ स्वरूपात उत्पादन करायचे, असेही रामदास कदम म्हणाले.