‘गाई’ला वाचवा अन्ं ‘बाई’ला नाचवा असा भाजप-शिवसेनेचा कारभार

- कोढाणाचे बालगंगा धरण बंद केल्याने पाणी टंचाई
खारघर – केंद्रात-राज्यात भाजप-शिवसेनेचे युती सरकार आहे. या सरकारने गोमाता रक्षणाच्या नावावर गोरक्षकांनी मुस्लिम, दलित समाजावर अन्याय अत्याचार केले. तसेच महामार्गालगतचे बंद केलेले डान्सबार सुरु करुन तरुणांना बरबाद करण्याचे धोरण घेतले आहे. त्यामुळे ‘गाई’ला वाचवा अन्ं ‘बाई’ला नाचवा असे धोरण घेणा-या भाजप-शिवसेनेला सत्तेतून जनतेने उखडून फेकावे,असे आवाहन शेकापचे सचिन ताडफळे यांनी केला आहे.
खारघर येथील सेक्टर 12 मध्ये कोपरासभा घेण्यात आली. यावेळी महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार, नगरसेवक हरिश केणी, साधना हिंग आदी उपस्थित होते.
ताडफळे म्हणाले की, भाजप-शिवसेना सरकारने कोढाणाचे बालगंगा धरण बंद करण्याचा उद्योग केला आहे. त्यामुळे खारघर आणि पनवेलमधील कृत्रिम पाणी टंचाईची कु-हाड कोसळली आहे. या पाणी टंचाईमुळे महिला वर्ग पुरता हैराण झाला आहे. तसेच या सत्ताधा-यांनी शंभर खाटाचे आरोग्य केंद्र बंद केले आहे. त्यामुळे जनतेच्या आरोग्या सुविधा मिळण्यापासून वंचित राहू लागले आहेत. उलट पनवेल महापालिकेच्या अर्थसंकल्पातून 217 कोटी विनाकारण शिल्लक ठेवले आहेत. त्याचा उपयोग काय? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या सरकारने पेट्रोल-डिझेल महाग करुन ठेवले. गॅसही महाग केले. मुंबईमध्ये 86 टक्के महिला असुरक्षित असल्याचा सर्व्हे एका वृत्तपत्राने जाहीर केले आहे. गाईला वाचवा आणि बाईला नाचवा असा सत्ताधारी भाजप-शिवसेनेचा कारभार सुरु आहे. या लोकांना सत्तेतून कायमचे हटवा, असेही त्यांनी म्हटले आहे.