‘गडकरी साहेब, जातीचे राजकारण करणाऱ्या मोदींना कधी, कुठे आणि कुठल्या चौकात फोडून काढणार?’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सोलापूरमधील अकलूज येथील सभेमध्ये विरोधकांनी मी खालच्या जातीचा असल्याने अनेकदा माझ्यावर टीका केल्याचा आरोप केला. ज्यांचे आडनाव मोदी ते सर्व जण चोर का आहेत असे वक्तव्य काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले होते. याच वक्तव्याचा समाचार घेताना मोदींनी राहुल यांच्यावर टिका केली. मात्र आता मोदी यांच्या या टिकेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वक्तव्याच्या आधारे मोदींना खोचक टोला लगावला आहे.
नितीन गडकरी यांनी याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात पिंपरी-चिंडवडमधील एका कार्यक्रमामध्ये जातीयवाद आणि सांप्रदायिक मुक्त, आर्थिक-सामाजिक समता आणि एकतेवर आधारित समाज संघटन होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले होते. यावेळी बोलताना त्यांनी ‘जो जातीचं नाव काढेल त्यांना मी ठोकून काढेल’ असंही म्हटलं होतं. गडकरींच्या याच वक्तव्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींवर निशाणा साधला आहे. मी मागास जातीचा असल्याने काँग्रेसने मला शिव्या दिल्या असं वक्तव्य करणाऱ्या मोदींचा समाचार गडकरी कधी घेणार अशा आक्षयाचे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे.
राष्ट्रवादीने केलेल्या ट्विटमध्ये मोदींनी काल जातीवर आपल्यावर टिका होत असल्याचे केलेले वक्तव्य आणि गडकरी यांचे जातीचं नाव काढणाऱ्यांना फोडून काढण्याचं वक्तव्य बाजूबाजूला पोस्ट असलेला फोटो ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये फोटोबरोबर केवळ ‘गडकरी साहेब, कुठे?, कधी? कुठल्या चौकात?’ असा सवाल नितीन गडकरींना केला आहे. जातीवरुन राजकारण करणाऱ्या मोदींनी गडकरी कुठे? कधी? आणि कुठल्या चौकात फोडून काढणार असा सवालच राष्ट्रवादी काँग्रेसने गडकरींना केला आहे.
काय म्हणाले होते गडकरी जातीबद्दल बोलताना…
तुमच्याकडे जातीचा किती प्रभाव आहे याची मला कल्पना नाही. आमच्या पाचही जिल्ह्यांमधून जात हद्दपार झाली आहे. मी सर्वांना सांगूनच ठेवलयं की जो जातीचं नाव काढेल त्यांना ठोकून काढेन. जातीय वाद आणि सांप्रदायिकता मुक्त, आर्थिक तसेच सामाजिक समता आणि एकता या मुल्यांच्या आधारे समाजाचे संघटन करायला हवे. कोण छोट्या जातीचा कोण मोठ्या जातीचा असा विचार कधीही करता कामा नये असं मत गडकरींनी पिंपरी चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलमच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले होते.