गंभीरचा निर्णय धाडसी; रिकी पॉन्टिंगची कबुली

नवी दिल्ली – कर्णधारपद सोडणे हा खरोखरीच गंभीरचा धाडसी निर्णय होता. असे निर्णय नेहमी घेतले जात नाहीत. गंभीरचा हा निर्णय एक माणूस म्हणून त्याच्या व्यक्तिमत्वाबाबत बरेच काही सांगणारा आहे. कर्णधारपद सोडण्यासोबत उरवेल्या सामन्यांत न खेळण्याच्या त्याच्या निर्णयामुळे पृथ्वी शॉसारख्या तरुण फलंदाजाला संधी मिळाली, असे प्रशंसोद्गार ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगने काढले आहेत. पॉन्टिंगने गंभीरच्या निर्णयाची पाठराखण केली.
यंदाच्या आयपीएलधील प्रारंभीच्या सत्रात दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाची कामगिरी खराब राहिली. त्यामुळे सुरुवातीच्या सामन्यांमधील संघाच्या खराब प्रदर्शनाची जबाबदारी घेत गौतम गंभीरने संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. याबाबत आपले मत व्यक्त करताना पॉन्टिंग म्हणाला की, माझ्या मते गंभीरने कर्णधारपद सोडल्यामुळे संघाच्या प्रदर्शनावर कोणताही नकारात्मक परिणाम झाला नाही. पण माझ्यासारखेच अनेक जण गंभीरच्या निर्णयामुळे हैराण झाले होते.
मुंबईविरुद्धचा सामना संपल्यानंतर बोलताना पॉन्टिंगने तरुण भारतीय खेळाडूंचे विशेष कौतुक केले. यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या फलंदाजीचे आणि श्रेयस अय्यरच्या कर्णधारपदाचेही त्याने तोंड भरून कौतुक केले. अय्यरची कारकीर्द प्रदीर्घ राहील. केवळ आयपीएलमध्येच नाही तर भारतीय क्रिकेट संघासाठीही तो अनेक वर्षे खेळेल, अस भाकित पॉन्टिंगने वर्तवले.
आयपीएलच्या या सत्रात दिल्लीने केवळ 5 विजय मिळवले तर 9 सामन्यांमध्ये त्यांचा पराभव झाला. त्यामुळे गुणतालिकेत दिल्ली तळाच्या स्थानी आहे. मात्र, आपल्या अखेरच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 11 धावांनी पराभव करुन दिल्लीने यंदाच्या मोसमाचा शेवट गोड केला.
मॅक्सवेलचे अपयश अनपेक्षित
तर यावेळी ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज ग्लेन मॅक्सवेलच्या अपयशाबद्दल पॉन्टिंग म्हणाला की, मॅक्सवेलला यंदाच्या सत्रात कोणत्या कारणाने अपयश आले हे मला खरोखरीच समजत नाही. मॅक्सवेल हा उत्कृष्ट फलंदाज असून त्याने अनेक वेळा आपल्या संघाला एकहाती सामने जिंकून दिले आहेत. मात्र यंदा त्याच्या फलंदाजीला कोणते ग्रहण लागले होते हे कळत नाही. दिल्लीच्या संघाने आपल्या 14 पैकी 12 सामन्यांमध्ये मॅक्सवेलला खेळण्याची संधी दिली होती मात्र या सर्व सामन्यांमध्ये मिळून त्याला 14.08 च्या सरासरीने फक्त 169 धावाच करता आल्या, ज्यात त्याला केवळ तीनदा दोन आकडी धावा करता आल्या आहेत. कॉलिन मन्रो आणि जेसन रॉय यांच्या ऐवजी मॅक्सवेलला अपयशी ठरत असतानाही 12 सामन्यांमध्ये का खेळवले, असे विचारल्यावर पॉन्टिंग म्हणाला की, मॅक्सवेलचा स्पर्धेपूर्वीचा फॉर्म पाहता तो आमच्यासाठी विजय मिळवून देणारा खेळाडू ठरू शकेल अशी आम्हाला आशा होती.
आम्ही मॅक्सवेलला चौथ्या स्थानावर खेळवणार होतो. पण मॅक्सवेलच्या अनुपस्थितीत आम्ही ऋषभ पंतला संधी दिली. त्या सामन्यात ऋषभने चांगली कामगिरी केली. त्यानंतर प्रत्येक सामन्यात ऋषभ पंतच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडला. मॅक्सवेल संघात परतल्यानंतर त्याने सलामीवीर म्हणून त्याने 17, 2 आणि 22 धावा केल्या. चौथ्या क्रमांकावर त्याने 13 आणि 5 धावा केल्या. पाचव्या स्थानावर त्याने 47, 27, 4, 6 आणि 5 धावा केल्या. एकूणच मॅक्सवेलला आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही.