खोदकामात महावितरणच्या दोन वीजवाहिन्या तोडल्या

- दत्तवाडी पोलीस ठाण्यात कंत्राटदारावर गुन्हा दाखल
पुणे – पर्वती येथील पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईनच्या खोदकामात 12 तासात दोन वेळा महावितरणच्या दोन भूमिगत वीजवाहिन्या तोडल्याने सोमवारी सायंकाळी 5.15 वाजता पर्वती जलशुद्धीकरण केंद्रासह अरण्येश्वर व विठ्ठलवाडी परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला. याप्रकरणी महावितरणकडून दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान अरण्येश्वर परिसरात पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सायंकाळी सुरु करण्यात आला तर, जलशुद्धीकरण केंद्रासह सिंहगड रोड, विठ्ठलवाडी परिसराचा वीजपुरवठा सुरु करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत दुरुस्ती काम सुरु होते.
दत्तवाडी येथील जुन्या पर्वती 22 केव्ही उपकेंद्रातून एक्सप्रेस फिडरद्वारे पुणे महानगरपालिकेच्या पर्वती जलशुद्धीकरण केंद्राला वीजपुरवठा केला जातो. उपकेंद्राजवळच पुणे महानगरपालिकेच्या कंत्राटदाराकडून पाणीपुरवठ्याची पाईपलाईन टाकण्यासाठी खोदकाम सुरु आहे. सोमवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास जेसीबीने सुरु असलेल्या खोदकामात एक्सप्रेस फिडरची भूमिगत वाहिनी तुटली. त्यामुळे पर्वती जलशुद्धीकरण केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र महावितरणकडून या जलशुद्धीकरण केंद्राला जनता वसाहत 22 केव्ही या पर्यायी वीजवाहिनीद्वारे तातडीने वीजपुरवठा सुरु करण्यात आला होता.
त्यानंतर पुन्हा सायंकाळी 5.15 वाजता पाईपलाईनच्या खोदकामात जुन्या पर्वती उपकेंद्राला वीजपुरवठा करणारी 22 केव्ही भूमिगत वीजवाहिनी तुटली व उपकेंद्रातील आऊटगोईंग 3 वाहिन्यांचा वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या पर्यायी वीजपुरवठ्यासह अरण्येश्वर व सिंहगड रोड, विठ्ठलवाडी परिसराचा वीजपुरवठा सुद्धा खंडित झाला. यात अरण्येश्वर परिसराचा वीजपुरवठा पर्यायी व्यवस्थेतून सुरु करण्यात आला आहे. परंतु पर्वती जलशुद्धीकरण केंद्राला मूळ (एक्सप्रेस फिडर) व पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करणाऱ्या दोन्ही भूमिगत वीजवाहिन्या पाईपलाईनच्या खोदकामात तुटल्याने या केंद्राचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. रात्री उशिरापर्यंत या दोन्ही वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होणार आहे. पाईपलाईनच्या खोदकामात एकाच परिसरात 12 तासांच्या कालावधीत दोन भूमिगत वीजवाहिन्या तोडल्याप्रकरणी महावितरणकडून दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.