खासदार साबळेंनी मोदी, शहांना खोटे ठरविले – काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे यांचा आरोप

पिंपरी – मागील लोकसभा निवडणूकीपुर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिलेली आश्वासने देशातील नागरीक अद्याप विसरले नाहीत. त्यांच्या पक्षाच्या खासदारांना विसर पडला असला तरी भाजपची सर्व आश्वासने जनतेच्या लक्षात आहेत. पंधरा लाख रुपये प्रत्येक नागरिकांच्या खात्यात जमा करण्याचे आश्वासन दिलेच नव्हते, असे सांगून राज्यसभा खासदार अमर साबळे यांनी मोदी, शहांना खोटे ठरविले आहे, असा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी केला आहे.
पिंपरीत खासदार साबळे यांनी ‘मोदींनी प्रत्येक नागरीकांच्या खात्यात 15 लाख देऊ, असे आश्वासन दिले नव्हते’ असे वक्तव्य शनिवारी (दि. 26) पत्रकार परिषदेत केले. त्यावर साठे यांनी प्रसिध्दीपत्रक काढून प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदींचे 15 लाखांबाबतचे आश्वासन व्हिडीओसह सोशल मिडीयात अद्यापही उपलब्ध आहे. लोकसभा निवडणूकीनंतर भाजपा सरकारने चार वर्षात एकही आश्वासन पुर्ण केलेले नाही. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मोदींच्या आश्वासनांबाबत प्रश्न विचारल्यावर तो ‘चुनावी जूमला’ होता, असे उत्तर देतात. तर, पिंपरीत त्यांचेच खासदार साबळे हे मोदींसह शहांना देखील खोटे ठरवत दिशाभूल करणारे उत्तर देतात, असा आरोप साठे यांनी केला आहे.
केंद्रातील भाजपाचे हे सरकार त्यांचा कालावधी पूर्ण होईपर्यत जाहिरनाम्यातील एकही आश्वासन पूर्ण करणार नाही. उलट पत्रकारांना व जनतेलाच खोटे ठरवतील. मोदींची प्रतिमा जगभर ‘फसवा पंतप्रधान’ म्हणून तयार झाली असताना त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार अशी वक्तव्य करुन त्याला दुजोरा देत आहेत. अशा पंतप्रधानांना आणि भाजपाला पुढील वर्षात होणा-या लोकसभा निवडणूकीत मतदार राजा घरी बसवल्याशिवाय राहणार नाही, असे प्रसिध्दी पत्रक शहराध्यक्ष साठे यांनी काढले आहे.