breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
खासदार शिवाजीराव आढळराव पाटीलांमुळे खेड तालुक्याच्या विकासाला ‘खोडा’

- माजी आमदार दिलीप मोहिते यांची जहरी टीका
- खासदारांच्या निष्क्रीयपणाचा शेतक-यांना फटका
पाबळ – प्रस्तावित विमानतळ, एमआयडीसी, रेल्वे मार्ग, ’एसईझेड’ आणि विविध प्रकल्पांना विरोध करण्याशिवाय खेड तालुक्यात विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी कोणतेही काम केले नाही. किंबहूना गोसाईसीपासून धावडी आणि धावडीपासून पिंपळगावपर्यंतचा रस्ता तरी करावा, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांची होती, मात्र या रस्त्यालाही अद्याप मुहूर्त मिळाला नाही. त्यामुळे खासदारांनी गेल्या १५ वर्षांत काय केले? असा प्रश्न राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहीते यांनी उपस्थित केला आहे.
शिरुर लोकसभा मतदार संघात गेल्या १५ वर्षांपासून खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची एकहाती सत्ता आहे. मात्र, खेड आणि परिसरातील विकास प्रकल्पांसाठी खासदारांनी कायम दुटप्पी भूमिका घेतली आहे. परिणामी, स्थानिक नागरिकांमधून नाराजीचा सूर आहे. त्यातच खासदार आढळराव पाटील यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप मोहीते यांनीही विकासकामे रखडल्यामुळे खासदारांवर तोफ डागली आहे.
माजी आमदार दिलीप मोहीते म्हणाले की, पिंपळवाडी ते दौंडकरवाडी पर्यंतच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले. पण, हा रस्ताही अपूर्ण आहे. कन्हेरसरच्या दक्षिणेकडील भागात बाबासाहेब कल्याणी यांची जमीन आहे. या परिसरात जायचे झाल्यास तोच रस्ता वापरावा लागणार आहे. त्यामुळे या रस्त्याचे रुंदीकरण झाल्यास गावाला आणि त्यांनाही फायदा होणार आहे. विशेष म्हणजे, स्पशेल इकॉनॉमिक झोन (एसईझेड) अंतर्गत येणारी ठाकर समाजाची वाडी येत होती. त्याची वेगळी वसाहत करण्यात आली. त्यातील लोकांना पुन्हा वा-यावर सोडण्यात आले. त्या लोकांनी जायचे कुठे? असा प्रश्नही मोहिते यांनी उपस्थित केले.
रेल्वे मार्गाबाबत खासदार आढळराव पाटील कायम वक्तव्य करीत असतात. खेड तालुक्यातील शेतक-यांच्या जमिनी रेल्वे मार्गासाठीही जाणार आहेत. त्याला शेतक-यांचा विरोध होणार नाही का? नेमकी रेल्वे जाणार कुठून? रेल्वेसाठी जमिनी दिल्या, तर त्याचा फायदा शेतक-यांना होणार का? याचे उत्तरही खासदारांनी द्यावे, असा टोलाही मोहिते यांनी लगावला आहे. तसेच, खेड विमानतळ होवू दिले नाही. पिण्याच्या पाण्याची सुविधा होवू दिली नाही. रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावले नाही.शासनाकडून खेडच्या विकासासाठी विविध प्रकल्प प्रस्तावित आहेत. मात्र, खासदारांच्या आडमुठेपणामुळे सर्वसामान्य नागरिकांना फटका सहन करावा लागतो आहे, असेही माजी आमदार दिलीप मोहिते म्हणाले आहेत.
‘विरोध’ हाच खासदारांचा अजेंडा…
राज्यात पूर्वी आघाडीचे सरकार होते. त्यावेळी खेड तालुक्यात विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्प आले. त्याला विरोधी पक्ष म्हणून खासदार आढळराव पाटील यांनी विरोध केला. आता राज्यातील सत्तेत सहभागी असताना भाजपला विरोध करण्यासाठी प्रकल्पांना विरोध करण्याची भूमिका खासदारांची आहे. पुणे-नाशिक महामार्ग, खेड विमानतळ यासह महत्त्वाकांक्षी प्रकल्प तालुक्यात येत असतानाही खासदार अडवणूक करतात. कोणत्याही विकासकामाचे श्रेय घेण्यासाठीच त्यांनी कायम पुढाकार घेतला आहे. मात्र, विकास प्रकल्पांना ‘विरोध’ हाच खासदार आढळराव पाटील यांचा अजेंडा आहे, असे घणाघातही माजी आमदार दिलीप मोहिते यांनी केला आहे.