Mahaenews

खासदार उदयनराजेंचा जामिनासाठी अर्ज

Share On

सातारा :  सुरूचि राडाप्रकरणी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी शनिवारी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर बुधवारी (दि. 25) सुनावणी होणार आहे. दरम्यान, आ. शिवेंद्रराजे भोसले यांना यापूर्वीच तात्पुरता जामीन मिळाला आहे. या दोन्ही नेत्यांच्या जामीन अर्जावर एकाच दिवशी सुनावणी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार बुधवारी खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

आनेवाडी टोल व्यवस्थापनावरून दि. 5 ऑक्टोबर 2017 रोजी आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुरूचि या बंगल्यावर खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे यांच्या समर्थकांमध्ये जोरदार धुमश्‍चक्री झाली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. त्यामुळे सातार्‍यात एकचखळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही नेत्यांच्या समर्थकांची धरपकड सुरू केली होती. या प्रकरणात दोन्ही बाजूंकडील सुमारे 150 हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

यानंतर आ. शिवेंद्रराजे व खा. उदयनराजे यांच्या समर्थकांनी जामीनासाठी अर्ज दाखल केले होते. त्यामध्ये काहींना जिल्हा न्यायालयात तर काहींना उच्च न्यायालयात जामीन मिळाला होता. तर आ. शिवेंद्रराजे भोसले यांनीही काही दिवसांपूर्वी जामीन मिळावा यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यांनाही ताप्‍तपुरता जामीन मंजूर झाला होता. यानंतर शनिवारी दुपारी खा. उदयनराजे यांच्यावतीने शनिवारी अ‍ॅड. ताहीर मणेर यांनी अर्ज दाखल केला.

अर्ज दाखल झाल्यानंतर न्यायालयात या अर्जावर सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड. मिलिंद ओक यांनी युक्‍तिवाद केला. या सुनावणीत अ‍ॅड. ओक यांनी न्यायालयाने दोन्ही राजेंची सुनावणी एकाच दिवशी ठेवावी. या सुनावणीस सर्व पोलिस अधिकार्‍यांनी उपस्थित रहावे, असा युक्‍तिवाद करण्यात आला. हा युक्‍तिवाद ग्राह्य मानत खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या जामीन अर्जावर बुधवार, दि. 25 रोजी सुनावणी होणार असल्याचे सांगितले. बुधवारी होणार्‍या सुनावणीत ज्येष्ठ विधीज्ञ अ‍ॅड. धैर्यशील पाटील हे खा. उदयनराजे भोसले यांची बाजू मांडणार आहेत.

 

Exit mobile version