खासगी बस दरवाढीची “कुऱ्हाड’

- पेट्रोल, डिझेल भडक्यामुळे निर्णय
पुणे – पेट्रोल-डिझेल किमतीबाबत सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत असला तरीही अद्याप त्यावर ठोस उपाय झालेला नाही. त्यामुळेच येत्या एक जूनपासून अनेक खासगी बसच्या दरात मोठी वाढ करण्यात येणार असल्याची माहिती पुणे बस ओनर्स असोसिएशनतर्फे देण्यात आली.
पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरात जवळपास 18 ते 20 हजार खासगी बस आहेत. या सर्वांमध्ये ही वाढ होणार आहे. 1 जूनपासून ही वाढ लागू होईल. दोन वर्षांपूर्वी स्कूलबस नियमावली बनविण्यात आली होती. त्यावेळी गाडीत 25 ते 30 बदल करायला लावले होते. त्यावेळी बस दरवाढ मोठ्या प्रमाणात झाली होती. तशी यंदा पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे होणार आहे. यंदा स्पीड गर्व्हनन्सही लागू झाला आहे. त्यामुळेच स्कूलबस तसेच अन्य खासगी बसच्या भाड्यात मागील वर्षीच्या तुलनेत दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ होणार आहे.
– राजेश जुनावणे, उपाध्यक्ष, पुणे बस ओनर्स असोसिएशन
गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किंमती कमी झाल्या असल्या तरीही सरकारी करामुळे सामान्यांवर याचा बोजा पडत आहे. याचाच परिणाम म्हणून आता काही खासगी बसेचा प्रवास महागणार आहे.
या बसभाडेवाढीबाबत माहिती देताना पुणे बस असोसिएशन आणि बस ऑपरेशन कॉन्फिड्रेशन ऑफ इंडिया या संघटनेचे उपाध्यक्ष राजेश जुनावणे म्हणाले, दोन ते तीन प्रकारच्या गाड्या आमच्या असोसिएशन अंतर्गत येतात. त्यामध्ये कामगारांच्या बसेस, स्कूल बस व पॅकेज टूरला ज्या गाड्या चालतात. या तीनही प्रकारच्या बसमध्ये दहा ते पंधरा टक्क्यांची वाढ होणार आहे. प्रासंगिक करारावर टूर्सच्या ज्या गाड्या चालत होत्या त्यांची किरकोळ दरवाढ वगळता मोठी दरवाढ तीन वर्षांत झालेली नव्हती. तीन वर्षांपूर्वी डिझेलचा भाव 58 रुपये 30 पैसे होता तर आता तो 71 रुपये 70 पैसे झाला आहे. त्यामुळे अर्थातच लिटरमागे 13 रुपयांनी वाढ झाली आहे. म्हणजेच एका किलो मीटरमागे साडेतीन चार रुपये खर्च वाढला आहे. त्यामुळेच त्या तुलनेत यंदा भाडेवाढही केली जाणार आहे.
स्कूलबस भाडेवाढ
किलो मीटरप्रमाणे अंतर प्रति महिना जुने दर प्रति महिना नविन दर
1 ते 3.5 किमी 900 1200
1 ते 5 किमी 1300 1700
1 ते 9 किमी 1600 2300
1 ते 14 किमी 2400 2700
जुनावणे म्हणाले, यंदा स्पीड गर्व्हनन्स लागू झाला असून त्यांतर्गत प्रत्येक प्रकारच्या बससाठी स्पीड लिमीट ठरविण्यात आली आहे. यासाठी गाड्यांना स्पीड डिवाईस बसवावे लागते; त्या डिवाईसची किंमत साधारण सात ते आठ हजार आणि त्याला बसविण्याचा खर्च पंधरा हजार व त्याची नोंदणी दरवर्षी करून घेण्यासाठी साधारण एक ते दीड हजार खर्च येतो. त्यामुळे या सर्व खर्चाचा भारही पर्यायाने ग्राहकांवरच येणार आहे. स्कूलबससाठी 40 चे स्पीड लिमीट ठरवून देण्यात आलेले आहे.