breaking-newsपुणेमहाराष्ट्र

खासगी बसचे दिवाळी भाडे सुसाट

दिवाळीत विदर्भ, मराठवाडय़ात प्रवासासाठी दुप्पट दर

दिवाळीच्या सुटीमध्ये मूळ गावी किंवा पर्यटनासाठी जाणाऱ्या नागरिकांना सध्या खासगी प्रवासी बसच्या सुसाट भाडेआकारणीचा अनुभव येतो आहे. खासगी बससाठी राज्य शासनाने भाडेनिश्चिती केली आहे. मात्र, अनेक वाहतूकदारांकडून शासनाचा हा आदेश धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने भाडेआकारणी केली जात आहे. त्यामुळे प्रवाशांच्या खिशाला मोठा भार सहन करावा लागतो आहे. पुण्यातून प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडय़ात जाण्यासाठी काही वाहतूकदार नेहमीच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक भाडे आकारत असल्याचे दिसून येत आहे. नियमापेक्षा जास्त भाडे घेणाऱ्या वाहतूकदारांवर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून देण्यात आला आहे.

दिवाळीच्या सुटीनिमित्त सध्या एसटीबरोबरच खासगी वाहतूकदारांकडे मोठय़ा प्रमाणावर बसचे आरक्षण होत आहे. सध्या पुणे शहरातून दररोज सुमारे आठशे खासगी प्रवासी बस राज्याच्या विविध भागांत सोडण्यात येत आहेत. शाळांना सुटी लागल्यानंतर ही संख्या वाढणार आहे. एसटीकडूनही जादा गाडय़ा सोडण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे एसटीची दिवाळी हंगामी १० टक्के दरवाढही सुरू झाली आहे. एसटीच्या तुलनेत खासगी प्रवासी बसचे भाडे प्रतिकिलोमीटर ५० टक्क्यांपेक्षा जास्त असणार नाही, असे सूत्र शासनाने ठरवून दिले आहे. मात्र, प्रत्यक्षात खासगी बसभाडय़ाची माहिती घेतली असता काही वाहतूकदार एसटीच्या तुलनेत दुप्पट भाडेआकारणी करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पुण्यातून विदर्भात नागपूर, अमरावती आदी भागांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे-नागपूर या प्रवासासाठी १६०० ते १८०० रुपयांपर्यंत भाडेआकारणी केली जाते. मात्र, दिवाळी मागणी लक्षात घेता काही वाहतूकदारांकडून साडेतीन ते चार हजार रुपये भाडे आकारले जात आहे. यवतमाळ, नांदेड, वाशीम, उस्मानाबाद, उमरगा आदी ठिकाणच्या भाडय़ातही दुपटीच्या आसपास वाढ करण्यात आली आहे. प्रवाशांची ही लूट थांबविण्यासाठी २७ एप्रिलला राज्य शासनाने खासगी बसच्या भाडेनिश्चितीचा आदेश काढला आहे. शासनाने ठरवून दिलेल्या भाडय़ाहून अधिक भाडे आकारणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार कारवाई करण्याची तरतूदही करण्यात आली आहे. मात्र त्याचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे वास्तव आहे.

वाहतूकदारांची भूमिका काय?

शासनाने दिलेल्या सूत्रानुसारच भाडेआकारणीचा प्रयत्न केला जातो. मात्र, काही वेळेला परतीच्या प्रवासात गाडी रिकामी आणावी लागते. त्यातून नुकसान सहन करावे लागत असल्याचा दावा एका संस्थेच्या व्यवस्थापकाकडून करण्यात आला. शासनाचे विविध कर, शुल्कांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दिवाळीत एसटीकडूनही हंगामी वाढ केली जाते. खासगी वाहतूकदार इतर वेळेला एसटीपेक्षा कमी दरात सेवा देतात. त्यामुळे वर्षभरातील तोटा भरून काढण्यासाठी मागणीच्या काळात खासगी बसच्या भाडय़ातही काहीशी वाढ केली जाते, अशी कबुलीही या व्यवस्थापकाने दिली.

भाडेनिश्चिती कशी

भाडेवाढ करून प्रवाशांची लूट होऊ नये यासाठी राज्य शासनाने भाडेनिश्चिती केली आहे. त्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसच्या भाडय़ाचा आधार घेण्यात आला आहे. त्यानुसार संपूर्ण बससाठी प्रतिकिलोमीटर कमाल भाडे आकारणीचे सूत्र ठरवून दिले आहे. एसटीच्या संपूर्ण बससाठी येणाऱ्या प्रतिकिलोमीटर भाडय़ापेक्षा खासगी संपूर्ण बसचे प्रतिकिलोमीटर भाडे ५० टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही, अशा पद्धतीने भाडेनिश्चिती आहे. शयनयान बससाठी एसटीचे प्रतिबस प्रतिकिलोमीटर भाडे ६४.४० रुपये होते. खासगी बससाठी ते ९६.६० रुपयांवर जाऊ नये. व्होल्व्होसारख्या ४३ आसनांच्या गाडय़ांसाठी प्रतिबस प्रतिकिलोमीटर भाडे १६९.८६ रुपयांच्या आताच हवे.

शासनाने घेतलेल्या निर्णयानुसारच खासगी कंत्राटी परवाना घेतलेल्या वाहनांचे भाडेदर आकारण्यात यावेत. जादा भाडे आकारल्याच्या तक्रारी मिळाल्यास संबंधित वाहनांवर मोटार वाहन कायदा आणि त्याअंतर्गत असलेल्या तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल.

– विनोद सगरे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button