ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खाते क्रमांक चुकल्याने अकोल्यातील व्यापाऱ्याच्या बँक खात्यात तीन कोटी जमा!

अकोला : अचानक लॉटरी लागावी तसे, अकोल्यातील टान्सपोर्ट व्यवसायी नीलेश भानुशाली यांच्या बँक खात्यामध्ये मंगळवारी दुपारी तीन कोटी रुपये जमा झाले. त्यामुळे भानुशाली परिवाराला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. कोणताही मोठा आर्थिक व्यवहार झालेला नसताना हे तीन कोटी रुपये आले तरी कोठून, या विचारातच भानुशाली परिवाराची मंगळवारची झोप उडाली. बुधवारी सकाळी इंदूरच्या दुबे नामक व्यापाऱ्याने स्टेट बँकेतून भानुशाली यांचा भ्रमणध्वनी क्रमांक मिळवून संपर्क साधला. तुमच्या खात्यात चुकून पडलेली तीन कोटींची रक्कम परत करावी अशी विनंती केली. हा सारा गोंधळ खाते क्रमांक चुकल्याने झाल्याचेही समोर आले. दरम्यान बुधवारी दूपारी तीन कोटीची ही रक्कम दूबे यांच्या मुंबईच्या खात्यात वळती करण्यात आली. या प्रकारामुळे भानुशाली एका दिवसासाठी कोट्यधीश झाले अन् प्राप्तिकर खात्यामध्ये नोंद ही झाली.

अकोल्यातील टान्सपोर्ट व्यवसायी नीलेश भानुशाली यांचे बाळापूर बायपास मार्गावर खोडीदार रोड लाइन्सचे कार्यालय आहे. कार्यालयाच्या दैनंदिन आर्थिक व्यवहारासाठी भानुशाली यांनी खोडीदार रोड लाइन्सचे करंट अकाऊंट स्टेट बँकेच्या डाबकी रोड शाखेत काढलेले आहे. ट्रान्सपोर्टचा दैनंदिन व्यवहार नियमित सुरू असताना मंगळवार, ३ एप्रिल रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान अचानक त्यांच्या या करंट खात्यात तीन कोटी रुपये जमा झाल्याचा संदेश आला. मुंबई येथील एचडीएफसी बँकेच्या एका खात्यातून आलेल्या तीन कोटींच्या रकमेमुळे भानुशाली यांना आर्श्चयाचा सुखद धक्काच बसला आणि तेवढेच ते घाबरलेही. एवढी मोठी रक्कम आली तरी कुठून, कोणी पाठविली असेल, या विचारात ते सापडले. नीलेश भानुशाली यांनी यूएसमध्ये राहणारा निखिल आणि मुंबईत येथील यश नामक मुलांना हा घटनाक्रम सांगितला. त्यांनाही आश्चर्य वाटले.

 दरम्यान, नीलेश भानुशाली यांची पत्नी नयना यांनी ही रक्कम दोन दिवसांत कुणी मागितली नाही, तर सरकारजमा करू, असा विचार केला होत मात्र , बुधवारी सकाळी इंदूरहून दुबे नामक इसमाने भानुशाली यांचा शोध घेत संपर्क साधला. कापसाच्या गाठींच्या व्यवहारातील ही रक्कम मुंबईहून पाठविताना बँक खात्याचा क्रमांक चुकल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे तीन कोटींची रक्कम परत वळती करण्यासाठी दुबे यांनी, भानुशाली यांना विनंती केली. दरम्यान, मुंबई एचडीएफसी बँकेच्या व्यवस्थापकांनीही अकोल्याच्या स्टेट बँक डाबकी रोड शाखेच्या व्यवस्थापकांशी संपर्क साधून याबाबत अवगत केले. त्यानंतर भानुशाली यांनी तीन कोटी रकमेचा आणि माझा काहीही संबंध नसल्याचे फर्मचे पत्र बँकेला दिले. त्यानंतर तीन कोटींची ही रक्कम बुधवारी मुंबई येथील एचडीएफसी बँकेच्या त्याच खात्यात (रिव्हर्स) वळती झाली.

-बँक खाते क्रमांक चुकल्याने तीन कोटींची रक्कम मंगळवारी भानुशाली यांच्या खात्यात आली. भानुशाली यांनी याबाबत प्रामाणिकपणे लेखी पत्र दिले. त्यानंतर रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार ही रक्कम  वळती (रिव्हर्स) केली गेली.
-गजानन थत्ते, स्टेट बँक शाखा व्यवस्थापक अकोला.

– अचानक कोट्यवधी रुपये कुणाच्या बँक खात्यात येत असतील, तर खातेदार आणि बँक व्यवस्थापक यांनी तातडीने संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवावी; अन्यथा भविष्यात चौकशी होऊ शकते.
– तुकाराम गायकवाड, व्यवस्थापक, अग्रणी जिल्हा बँक अकोला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button