क्लॅट परीक्षेचा निकाल आज

नवी दिल्ली – विधी अभ्यासक्रमासाठीची सामायिक परीक्षा “क्लॅट’चा निकाल आज (गुरुवारी) जाहीर केला जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने आज जाहीर केले. यामुळे देशभरातील प्रतिथयश 19 विधी महाविद्यालयांमधील प्रवेश प्रक्रियेला सुरूवात होऊ शकणार आहे.
उद्या जाहीर होणाऱ्या “क्लॅट’ परीक्षेच्या निकालाला स्थगिती मिळावी यासाठी काही उमेदवारांनी सुटीकालिन न्यायाधीश. एल.एन. राव आणि एम.एम. शांतानगौडर यांच्या न्यायालयात दाखल केल्या होत्या. 13 मार्च रोजी झालेल्या “क्लॅट’ परीक्षेमध्ये काही अडचणी आल्या होत्या. त्यामुळे काही उमेदवारांचा महत्वाचा वेळ वाया गेला होता. ही मूलभूत हक्कांची पायमल्ली असल्याने या परीक्षेच्या निकालाला स्थगिती द्यावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांच्यावतीने करण्यात आली होती.
मात्र परीक्षेच्या निकालाला स्थगिती न देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आणि “नॅशनल य्तुनिव्हर्सिटी ऑफ ऍडव्हान्स्ड लीगल स्टडीज’ने स्थापन केलेल्या तक्रार निवारण कमिटीला विद्यार्थ्यांच्या तक्रारींबाबतचा अहवाल 6 जूनपर्यंत सादर करण्याच्या सूचना केल्या.