क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत घरोघरी जावून होणार तपासणी

पिंपरी ( महा ई न्यूज ) – राष्ट्रीय शहर क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमातंर्गत पिंपरी चिंचवड शहरात क्षयरोगावर पुर्णपणे नियंत्रण मिळविण्यासाठी क्षयरोग शोध मोहीम राबविण्यात येत आहे. ही मोहीम आज (सोमवार) पासून घरोघरी जावून प्राथमिक तपासणी करुन क्षयरोग रुग्णांचा शोध घेण्यात येणार आहे, अशी माहिती शहर क्षयरोग नियंत्रण अधिकारी डॉ. बाळासाहेब होडगर यांनी दिली.
क्षयरोग गंभीर संसर्गजन्य रोग असला तरी, योग्य पध्दतीने उपचार घेतल्यास या आजारावर मात करता येते, त्यामुळे या मोहिमेतंर्गंत शहरातील कुपोषीत, एचआयव्ही बाधीत झोपडपट्टी, आश्रमशाळा, कामगार वसाहती येथे प्राथमिक तपासणी करण्यात येणार आहे. कर्मचारी प्रत्यक्ष घरोघरी जाऊन भेट देऊन क्षयरूग्णांचा शोध घेणार आहेत. तसेच त्यांची थुंकी तपासणी आणि क्ष- किरण तपासणी करण्यात येणार आहे. गरज भासल्यास रूग्णांची सीबीनेट या अत्याधुनिक मशिनद्वारे तपासणी केली जाणार आहे. त्याचबरोबर रूग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत.
दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला, संध्याकाळी हलकासा येणारा ताप, वजनात झालेली लक्षणीय घट, भूक मंदावणे, थुंकीवाटे रक्त पडणे आदी लक्षणे आढळल्यास या मोहिमेतील आरोग्य कर्मचाऱ्यांना कळवा. किंवा शहर क्षयरोग नियंत्रण केंद्र, तालेरा रूग्णालय चिंचवड आणि महापालिकेच्या रूग्णालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. होडगर यांनी केले आहे.