कोल्हापुरात मराठा समाजाची महागोलमेज परिषद

राणेंसह कुणालाही निमंत्रण नाही
कोल्हापूर – सकल मराठा समाजाने आपल्या न्याय्य हक्कांसाठी महाराष्ट्र व इतर राज्यांत लाखोंच्या संख्येने शांततेत सुमारे 58 मूक मोर्चे काढले; पण शासनाने ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सकल मराठा समाज एकत्र येऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी कोल्हापुरात बुधवारी (दि.19) महागोलमेज परिषदेचे आयोजन केले असल्याची माहिती क्षत्रिय मराठा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष राजीव पाटील आणि उपाध्यक्ष जयेश कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली. ही परिषद येथील मार्केट यार्डमधील मुस्कान लॉन येथे सकाळी 10.30 वाजता सुरू होईल व ती दिवसभर चालेल.
सकल मराठा समाजाच्यावतीने कोल्हापुरात यापूर्वी पहिली गोलमेज परिषद झाली, त्यानंतरच आंदोलनाची ठिणगी पडली होती. त्यानंतरच राज्यभर व राज्याच्या बाहेरही सकल मराठा समाजाचे लाखोंच्या संख्येने मोर्चे शांततेत निघाले; पण शासनाने कोणताही निर्णय दिलेला नाही. मोर्चानंतर राज्यात विविध निवडणुका लागल्यामुळे सकल मराठा समाज शांत राहिला. त्यामुळे मोर्चानंतर पुढे काय अशी विचारणा राज्यभरातून होत होती.
त्याचा म्हणून पुढे कसे जायचे याचा कृती कार्यक्रम निश्चित करण्यासाठीच पुन्हा महागोलमेज परिषदेचे आयोजन केले आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे लोन पसरू लागले आहे, तर कोपर्डीसारख्या घटना घडल्याने कोल्हापूरच महागोलमेज परिषदेसाठी निवडल्याचेही यावेळी सांगण्यात आले. मराठा समाजाच्या मागण्यांबाबत न्यायालयात सुरू असलेल्या लढ्याबाबत या महागोलमेज परिषदेत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.