कोलकाता व हैदराबादसाठी अंतिम फेरी हेच लक्ष्य

- आयपीएल क्वालिफायर-2 लढतीत आज चुरशीच्या झुंजीची अपेक्षा
कोलकाता – आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेचा अखेरचा टप्पा सुरू झाला असून आज रंगणाऱ्या क्वालिफायर-2 लढतीत सर्वांचे अंदाज चुकवून गुणतालिकेत अग्रस्थान पटकावणाऱ्या सनरायजर्स हैदराबाद संघासमोर दोन वेळेस आयपीएलचे विजेतेपद पटकावलेल्या कोलकाता नाईट रायडर्सचे कडवे आव्हान आहे. या दोघांमधील विजयी संघ अंतिम सामन्यात पोहोचेल, तर पराभूत संघाचे स्पर्धेतील आव्हान संपणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघाने याआधीच क्वालिफायर-1 लढतीत हैदराबादला पराभूत करून अंतिम फेरीत धडक मारली आहे. साखळी सामन्यांमध्ये अव्वल स्थानी राहिलेल्या सनरायजर्स हैदराबादला अखेरच्या चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे तर कोलकाताने अखेरचे चार सामने जिंकून मालिकेत पुनरागमन करत क्वालिफायर-2 लढतीत स्थान मिळवले आहे.
अखेरच्या सामन्यात कोलकाताने प्रभावी गोलंदाजीच्या जोरावर राजस्थानच्या फलंदाजांना जखडून ठेवत विजय खेचून आणला होता, तर हैदराबादने अखेरच्या काही षटकांमध्ये केलेल्या सुमार गोलंदाजीमुळे चेन्नईने पराभवाच्या छायेतून बाहेर येत विजय मिळवला होता. हैदराबादच्या संघाने या मोसमात आतापर्यंत आपल्या पंधरा सामन्यांपैकी 9 सामन्यांत विजय मिळवला असून आपल्या सहा पराभवांपैकी चार पराभव त्यांना अखेरच्या चार सामन्यांमध्ये लागोपाठ स्वीकारावे लागले आहेत. त्यामुळे त्यांचा संघ सध्या दडपणाखाली असून कर्णधार केन विल्यम्सन, शिखर धवन आणि मनीष पांडे वगळता इतर फलंदाजांनी केवळ हजेरी लावली आहे. गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार व रशीद खान वगळता बाकी गोलंदाज महागडे ठरत आहेत.
यंदाच्या मोसमात विल्यम्सनने 685, धवनने 437, तर मनीष पांडेने 284 धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजीमध्ये भुवनेश्वरने 9, रशीद खानने 18, सिद्धार्थ कौलने 19 आणि शकिब अल हसनने 13 जणांना बाद केले आहे. आयपीएलमधील सर्वोत्तम आक्रमण असा लौकिक मिळविणाऱ्या या गोलंदाजांकडून उद्या हैदराबादला मोठ्या अपेक्षा आहेत. दुसरीकडे कोलकाता संघाने या मोसमात आपल्या 15 सामन्यांपैकी 9 सामन्यांत विजय मिळवला आहे. त्यांनी 6 सामने गमावले असले, तरी आपले अखेरचे चारही सामने जिंकून त्यांनी विजयाची लय गवसल्याचे दाखवून दिले आहे. या चारही सामन्यांमध्ये त्यांच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी समतोल कामगिरीची नोंद केली आहे. कोलकाताकडून आतापर्यंत कर्णधार दिनेश कार्तिकने 490, सुनील नारायणने 331, तर आंद्रे रसेलने 313 धावा केल्या आहेत. गोलंदाजांमध्ये प्रसिद्ध कृष्णाने 10, सुनील नारायणने 16 आणि रसेलने 13 फलंदाजांना बाद करत संघाच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला आहे.
प्रतिस्पर्धी संघ-
सनरायजर्स हैदराबाद– केन विल्यमसन (कर्णधार), शिखर धवन, मनीष पांडे, भुवनेश्वर कुमार, वृद्धिमान साहा, सिद्धार्थ कौल, दीपक हूडा, खलील अहमद, संदीप शर्मा, युसुफ पठाण, श्रीवत्स गोस्वामी, रिकी भुई, बेसिल थंपी, टी. नटराजन, सचिन बेबी, विपुल शर्मा, मेहंदी हसन, तन्मय अग्रवाल, ऍलेक्स हेल्स, कार्लोस ब्रेथवेट, रशीद खान, शकीब अल हसन, मोहम्मद नबी व ख्रिस जॉर्डन.
कोलकाता नाईट रायडर्स – दिनेश कार्तिक (कर्णधार), ख्रिस लिन, रॉबिन उथप्पा, आंद्रे रसेल, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, सुनील नारायण, कुलदीप यादव, पियुष चावला, शिवम मावी, मिचेल जॉन्सन, शुभमन गिल, विनय कुमार, रिंकू सिंग, कॅमेरॉन डेलपोर्ट, जावोन सिरलेस, अपूर्व वानखेडे, इशांक जग्गी व टॉम करन.
सामन्याचे ठिकाण- कोलकाता. सामन्याची वेळ- सायंकाळी 7 पासून.