कोथरूडमधील 21 प्रश्नांसंदर्भात मेधा कुलकर्णी यांची आयुक्तांना भेट

पुणे – चांदणी चौक येथील नियोजित उड्डाणपुलासाठी लागणारे भूसंपादन येत्या 15 ऑगस्टपर्यंत करण्यात येईल. याबाबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना कळवण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त सौरव राव यांनी आमदार मेधा कुलकर्णी यांना दिले.
कोथरूड विधानसभा मतदारसंघातील 21 प्रलंबित प्रश्नांसंदर्भात कुलकर्णी यांनी महापालिका सौरभ राव यांची भेट घेतली. भूसंपादन होत नसल्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून होणारे चांदणी चौकातील पुलाचे काम रखडले आहे. गडकरी यांच्याच हस्ते पुलाचे भूमीपूजन करण्यात आले. त्यानंतर भूसंपादनाचे काम सुरू झाले. एकूण जागेपैकी साडेपाच हेक्टर जागा ताब्यात आली आहे.
मात्र, 6 हेक्टर जागा अजून मिळायची आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी भूसंपादन मुदतीत पूर्ण करण्याची तंबी गडकरी यांनी महापालिकेला दिले होती. त्या जागेत एका धार्मिक संस्थेचा आश्रम आणि अन्य काही आस्थापना आहेत. 88 सदनिकाधारकांपैकी 47 जणांना नुकसानभरपाई दिली असून, त्याची कायदेशीर पूर्तता झाली आहे, असे आयुक्तांनी सांगितले. शहर अभियंता प्रशांत कुलकर्णी तसेच महापालिकेचे अन्य अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते.
पुलासाठीची जागा संपादीत होत नाही तोपर्यंत काम सुरू होणार नाही, असे गडकरी यांनी त्यांच्या पुणे दौऱ्यात स्पष्ट केले होते. त्यानंतर या कामाला गती मिळाली असून, येत्या काही दिवसात ठेकेदार कंपनीला कार्यारंभ आदेश मिळेल, असे आमदार कुलकर्णी यांनी सांगितले.