कॉंग्रेसने जारी केली खुद्द येडियुरप्पांच्या आवाजातील टेप

- भाजप आमदारांच्या आणखी दोन संभाषण टेप कॉंग्रेसने केल्या जारी
- कॉंग्रेस आमदारांना अमिषे दाखवून फोडण्याचा प्रयत्न
बंगळुरू – भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कॉंग्रेसच्या आमदारांना फोडण्यासाठी दबाव तंत्राचा तसेच अमिषे दाखवण्याचा प्रकार केला, याच्या पुष्ट्यर्थ कॉंग्रेसने भाजपच्या आणखी दोन नेत्यांच्यावतीने करण्यात आलेल्या फोन कॉल्सच्या टेप्स पत्रकारांना ऐकवल्या.
आज विश्वासदर्शक ठरावाच्या आधी जारी करण्यात आलेल्या या टेपमधील एक टेप खुद्द येडियुरप्पा यांच्या आवाजातील आहे. त्यात येडियुरप्पा यांनी कॉंग्रेसचे सदस्य बीएस पाटील यांना पक्षांतर करण्याची सूचना केली आहे. त्यात येडियुरप्पा यांनी आमदार पाटील यांना सांगितले आहे की तुम्ही कॉंग्रेसच्या बस मधून खाली उतरा आणि आम्हाला जॉईन करा आम्ही तुम्हाला मंत्रिपद देऊ असे त्यांनी म्हटल्याचे ऐकू येते. तुम्हाला आम्ही पाहिजे तशी आम्ही तुम्हाला मदत करू असेही येडियुरप्पा त्यांना सांगत असल्याचेही यात ऐकू येते आहे.
थेट मुख्यमंत्र्यांकडूनच आमदार फोडण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न आहे असा आरोप करून कॉंग्रेसने म्हटले आहे की भाजपचे नेते सत्तेसाठी किती खालच्या थराला जाऊ शकतात याचा हा पुरावा आहे. कॉंग्रेस कडून जारी करण्यात आलेली दुसरी टेप येडियुरप्पा यांचे पुत्र विजेयंद्र यांची आहे.कॉंग्रेसने या आधी भाजपचे आमदार जर्नादन रेड्डी यांचीही एक टेप प्रसृत केली होती त्यात वादग्रस्त रेड्डीबंधुंपैकी जनार्दन रेड्डी यांनी रायचूर ग्रामीण मतदार संघातून निवडून आलेल्या आमदाराला तुम्हाला आम्ही शंभरपट श्रीमंत करू असे आमिष दाखवले आहे. या टेप मध्ये, जनार्दन रेड्डी यांनी या आमदाराला सांगितले की आमदार फोडण्याची जबाबदारी भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आपल्यावर टाकली असून त्यांचा आपल्याला पिांठंबा आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
तथापी भाजपचे निरीक्षक प्रकाश जावडेकर यांनी याचा इन्कार केला आहे. भाजप अध्यक्ष असल्या घडामोडीत सहभागी नसतात असे त्यांनी म्हटले आहे.