कैलास मानसरोवर यात्रेला पारंपरिक उत्साहात शुभारंभ

नवी दिल्ली : जगभरात सर्वात पवित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कैलास मानसरोवर यात्रेला शुक्रवारपासून उत्साहात प्रारंभ झाला. सर्वाधिक उंच असणाऱया शिवधाम कैलास मानसरोवरासह 12 ज्योतिर्लिंगांना भारतीय संस्कृतीत आदराचे स्थान आहे. येथे श्री शंकराचे त्रिकाल वास्तव्य असल्याचे सांगितले जाते. यामुळेच दरवर्षी येथे दर्शनासाठी देशविदेशातून लाखोंच्या संख्येने भक्तगण येतात. कैलास मानसरोवर हे चीनमधील तिबेट प्रांतामध्ये वसलेले आहे.
या यात्रेसाठी मुख्यत्वे करून दोन प्रमुख मार्ग आहेत. विदेश मंत्रालय दरवर्षी जून ते सप्टेंबरदरम्यान या यात्रेचे आयोजन करते. पहिला उत्तराखंडमधील लिपुलेख दर्रा आणि दुसरा सिक्किममधील नाथुला दर्रा. कैलास मानसरोवरला पोहचण्यासाठी नेपाळमधून जावे लागते. मागील वर्षी चीनने नाथुला दर्राचा मार्ग बंद केल्यामुळे यात्रेकरूंना मोठय़ा अडचणींना सामोरे जावे लागले होते. मात्र, यंदा हा मार्ग खुला करण्यात आला आहे. या निर्णयाचे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी स्वागत केले आहे.