breaking-newsआंतरराष्टीय

केनियामध्ये धरण फुटल्यामुळे 35 जणांचा मृत्यू

नैरोबी, (केनिया) – अतिवृष्टीमुळे मध्य केनियातील एक धरण फुटल्याने शेकडो घरे वाहून गेली आहेत. रात्रीच्या सुमारास घडलेल्या या आपत्तीमुळे झोपेत असलेल्या नागरिकांवर काळाचा घाला घातला गेला. यामध्ये किमान 35 जण मरण पावल्याचे वृत्त आहे. गेल्यावर्षीच्या दुष्काळानंतर केनियामध्ये गेल्या आठवड्यापासून मुसळधार पाऊस होत आहे. पूर आणि भूस्खलनामुळे आतापर्यंत 164 जण मरण पावले आहेत.

राजधानी नैरोबीपासून 150 किलोमीटरवर रिफ्ट खोऱ्यातील नकुरु शहराजवळच्या सोलाइ येथील सिंचनप्रकल्पासाठीचे पटेल हे धरण मत्स्योद्योगासाठीही वापरले जात होते. अतिवृष्टीमुळे हे धरण मध्यरात्रीच्या सुमारास अचानक फुटले. अचानक आलेल्या पूरामध्ये शेकडो नागरिक, अनेक घरे आणि गुरे वाहून गेली आहेत. बेपत्ता झालेल्या नागरिकांच्या शोधासाठी मोहिम उघडण्यात आली आहे. बचाव पथकांना आतापर्यंत 32 जणांचे मृतदेह मिळाले आहेत. आणखी अनेक जण बेपत्ता असल्याने त्यांचा शोध सुरू आहे. अनेक जणांचे मृतदेह चिखलामध्ये रुतलेले असल्याने चिखल उपसण्याचे कामही सुरू आहे. मृतांमध्ये लहान मुले आणि महिलांची संख्या अधिक आहे. अचानक आलेल्या पूरात पोहता न आल्याने त्यांचा मृत्यू झाला.

या पूरामुळे 500 कुटुंबे प्रभावित झाली आहेत, असे केनियातील रेडक्रॉस संघटनेने म्हटले आहे. या पूराच्या पाण्याने नकुरु शहराबरोबर काही खेडीही पाण्याखाली गेली आहेत. पूरात दोन शाळाही वाहून गेल्या आहेत. पूरग्रस्त भागांमधून सुमारे 2 लाख 20 हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. मार्च महिन्यापासूनच्या संततधार पावसामुळे 21 हजार एकरवरील शेतजमिन पाण्याखाली गेली आहे. तर 20 हजारापेक्षा अधिक जनावरे मरण पावली आहेत. पूरामुळे केनियाच्या अनेक भागातील रस्तेही वाहून गेले आहेत. त्यामुळे मदत कार्यात अडथळे येत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button