केजरीवाल यांच्या मेहुण्यासाठी ५० कोटींचं डील: कपिल मिश्रा

नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी केजरीवाल यांच्या मेहुण्यासाठी ५० कोटी रुपयांचं जमिनीचं ‘डील’ केलं होतं, असा गंभीर आरोप केजरीवाल मंत्रिमंडळातून डच्चू मिळालेले मंत्री कपिल मिश्रा यांनी केला आहे. छत्तरपूर येथे ७ एकर जागेवर केजरीवाल यांचा मेहुणा फार्महाउस उभारत असून त्यासाठी हे ‘डील’ करण्यात आल्याचे खुद्द जैन यांनीच खासगीत मला सांगितले, असेही मिश्रा म्हणाले.
सत्येंद्र जैन यांनी केजरीवाल यांना दोन कोटी रुपये दिल्याचा पुनरुच्चारही मिश्रा यांनी आज केला. आपण याबाबतचे सर्व पुरावे उद्या, मंगळवारी सकाळी ११.३० वाजता सीबीआयकडे सोपवणार आहे व याबाबत एफआयआर दाखल करणार आहे, असेही मिश्रा यांनी सांगितले.
मी आम आदमी पक्ष सोडणार नाही, असे मिश्रा यांनी स्पष्ट केले. मी भाजपचा एजंट असल्याचा आरोप करण्यात आला मात्र हा आरोप धादांत खोटा आहे. भाजप, काँग्रेस आणि नरेंद्र मोदी यांच्या धोरणांना माझा विरोध आहे तसेच भष्ट्राचाराविरोधातील माझी लढाई यापुढेही सुरू राहील असे त्यांनी नमूद केले. केजरीवाल यांच्या निकटवर्तीयांकडून मला ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत. मात्र मी अशा धमक्यांनी डगमगणार नाही, असेही त्यांनी पुढे सांगितले. दिल्लीतील महानगरपालिका निवडणूक आणि पंजाब विधानसभा निवडणुकीवेळी तिकीट वाटपात मोठ्या प्रमाणात सौदेबाजी झाली. पंजाबमध्ये तर फार्महाउसवर दारू पार्ट्या, पैशांची उधळण आणि पोरी पुरवण्यासारखे विकृत धंदे झाले. हे सगळंच धक्कादायक होतं, असा आरोपही मिश्रा यांनी पक्षावर केला.