केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते बीएसएफ अधिकाऱ्यांचा गौरव

नवी दिल्ली – केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत सीमा सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांना शौर्य आणि उत्कृष्ट सेवेसाठीचे पुरस्कार प्रदान करण्यात आले. आपल्या सेवेदरम्यान असामान्य शौर्य गाजवणाऱ्या 10 अधिकाऱ्यांना या सन्मान सोहळ्यात पोलीस पदके प्रदान करण्यात आली. तर, 4 अधिकाऱ्यांना मरणोत्तर पदके बहाल करून गौरविण्यात आले.
देशाचे रक्षण करताना असामान्य शौर्य गाजविणाऱ्या या अधिकाऱ्यांचा देशाला अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार राजनाथ सिंह यांनी काढले. देशाची एकता, एकात्मिकता आणि सार्वभौमत्व सर्वात महत्वाचे आहे आणि त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे ते म्हणाले. सीमा सुरक्षा दलातील प्रत्येक जवानासाठी स्वाभिमाना इतकाच देशाभिमानही मोलाचा वाटतो. आपल्या सैन्य दलांना प्रथम हल्ला करण्यापासून रोखण्यात आले आहे.
मात्र समोरुन येणाऱ्या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर कसे द्यावे हे त्यांना चांगलेच समजते, असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले. देशाच्या सीमेवरच्या भागात तस्करी रोखणे आणि बनावट नोटांच्या गैरवापरावर निर्बंध घालण्याच्या कामी सीमा सुरक्षा दल बजावत असलेल्या कामगिरीचे गृहमंत्र्यांनी यावेळी आवर्जुन कौतुक केले.