कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरपदासाठी 22 वर्षीय भारतीय वंशाचा उमेदवार

कॅलिफोर्निया – या प्रांताच्या गव्हर्नर पदासाठी 22 वर्षीय मुळ भारतीय वंशाचा तरूण तंत्रज्ञ उमेदवार म्हणून उभा राहिला असून त्याच्या उमेदवारीविषयी तेथे मोठे औत्स्युक्य निर्माण झाले आहे. शुभम गोयल असे त्याचे नाव असून त्याचा जन्म अमेरिकेतच झाला असला तरी त्याचे मुळ उत्तरप्रदेशात आहे. कॅलिफोर्निया राज्याच्या सर्व समस्यांवर आपण उपाय शोधून या भागात मोठा बदल घडवून आणू असा दावा करीत त्याने मतदारांना चांगलीच भुरळ घातली आहे.
सध्या तो तेथे रियालिटी मॅनेजर म्हणून काम करीत आहे. सध्या त्याने सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपला प्रचार सुरू केला आहे. तसेच तो स्वता हातात मेगाफोन घेऊन कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवरही प्रचार करताना दिसतो आहे. या प्रांताच्या कारभारात पारदर्शकता आणण्याचा कसोशिचा प्रयत्न आपण करू असा दावा त्याने केला असून मतदारांकडूनही त्याला कौतुकास्पद प्रतिसाद मिळत आहे. तो ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवत आहे. या निवडणुकीत एकूण 22 उमेदवार उभे आहेत.
आपल्या उमेदवारीविषयी बोलताना तो म्हणतो की येथे परिर्वतन घडवण्यासाठी कोणत्याहीं राजकीय पार्श्वभूमीची किंवा मोठ्या निधीची गरज नाहीं. जिंकून आल्यावर कॅलिफोर्नियासाठी आपण काय करणार याचा एक सात कलमी जाहीरनामाही त्याने प्रसिद्ध केला आहे. या साऱ्या पार्श्वभूमीवर त्याला मतदार कसा प्रतिसाद देतात हे पहाणे औत्स्युक्याचे ठरले आहे.