कृषीमंत्री राधामोहन सिंह यांनी घेतली नेदरलॅण्डच्या उपपंतप्रधानांची भेट

- कृषी आणि संबंधित क्षेत्रातील भागीदारीसंदर्भात चर्चा
नवी दिल्ली – केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंह यांनी आज नवी दिल्लीत, कृषी भवन येथे नेदरलॅण्डच्या उपपंतप्रधान आणि कृषी, निसर्ग आणि अन्न गुणवत्ता मंत्री कॅरोला स्काऊटॅन यांची भेट घेतली. यावेळी सिंह यांनी उभय देशातील कृषी आणि संबंधित क्षेत्रातील भागीदारी अधिक बळकट करण्याची इच्छा व्यक्त केली.
वर्ष 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा सरकारचा संकल्प आहे याचा पुनरुच्चार सिंह यांनी यावेळी केला. भारतीय कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या गरजेवर त्यांनी यावेळी जोर दिला. हरितगृह तसेच फुले, झाडे आणि भाज्या लागवडीमध्ये आणि पशुधन आणि वनस्पती लागवडीसारख्या क्षेत्रामध्ये वैविध्य आणण्यात नेदरलॅण्ड जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे, असे सिंह म्हणाले.
मार्च 2018 मध्ये संयुक्त कार्यगटाचे नियमित आयोजन केल्याबद्दल सिंह यांनी आनंद व्यक्त केला. यामध्ये विविध मुद्यांवर विस्तृत चर्चा करण्यात आली. 2021 पर्यंतची कृती योजना तयार करण्यात आली.
केंद्रीय कृषी मंत्री म्हणाले की, इंडो डच सहकार्याच्या मुख्य यशामुळे महाराष्ट्रातील बारामती येथे भाज्यांसाठी उत्कृष्टता केंद्र सुरू झाले आहे. महाराष्ट्रातल्या तळेगाव येथे दुसरे उत्कृष्टता केंद्र लवकरच सुरू होणार आहे.