कुस्तीचा ‘आवाज’ अन् गाढा अभ्यासक पैलवान सुरेश जाधव..!

महाराष्ट्राची भूमी ही संतांची, विचारवंतांची समाज सुधारकांची आहे. त्याचप्रमाणे कुस्तीगिरांचीसुद्धा आहे. महाराष्ट्राच्या कुस्तीला मोठा इतिहास आहे. पण, या कुस्तीला खरा आवाज नव्हता…अगदी मुकी कुस्ती होती पूर्वी…कुस्तीचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कोणतेही माध्यम त्याकाळी उपलब्ध नव्हते…मात्र, प्रभावी निवेदकांच्या आधारे हे काम आता सोपे झाले आहे. असाच कुस्तीचा प्रचार व प्रसार करणारा अवलीया म्हणजे कुस्ती निवेदन पैलवान सुरेश जाधव..त्यांच्या कार्याबाबत ‘महा-ई-न्यूज’ ने घेतलेला आढावा..!
—- लेखन व संकलन : रमेश पाटील.
सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात डोंगर कपारीत वसलेल जेमतेम दोन हजार लोकसंख्या असलेल गाव म्हणजे चिंचोली. वारणामाईमुळे सुजलाम सुपलाम गाव म्हणून चिंचोलीची ओळख आहे. त्याचप्रमाणे ‘कुस्तीगिरांची खाण’ असाही चिंचोलीचा अवघ्या महाराष्ट्रभर लौकिक आहे. याच चिंचोली गावचे सुपुत्र पैलवान सुरेश जाधव. जाधव यांनी आपले करिअर कुस्ती निवेदक म्हणून नावारुपाला आणले आहे. सुरेश जाधव यांचे आजोबा कै. आबा नाथा जाधव व वडील कै. जगन्नाथ आबा जाधव हे जुन्या काळात पैलवान होते. कुस्ती व भक्ती हे परंपरागत चालत आलेली परंपरा आहे. तोच वसा व वारसा घेवून पै. जाधव यांनी १९९६ ते २००४ दरम्यान अनेक मैदाने गाजवली आहे. मात्र, २००४ मध्ये कुस्ती खेळताना उजवा हात निकामी झाला. कुस्ती थांबली पोट भरण्यासाठी या लढवय्या पैलवानाला २००४ ते २०१० या काळात एका कारखान्यात हामालीचे काम करावे लागले.
मात्र, आतापर्यंतचा इतिहास आहे. ज्याने लाल मातीची सेवा केली. त्याना लाल मातीने कधीही परके केले नाही. असाच सुवर्णयोग सुरेश जाधव यांच्या जीवनात २३ मार्च २०११ रोजी घडून आला. माळवाडी मेनी येथे कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते. निमंत्रित कुस्ती निवेदक त्या मैदानाला उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे सुरेश जाधव यांच्या हातात ‘माईक’ आला. त्या संधीचं सोनं करून जाधव यांनी आपल्या करिअरला सुरूवात केली. सुरेश जाधव यांनी पहिल्या वर्षी जेमतेम १३ कुस्ती मैदानांचे समालोचन केले. तोच आकडा आता १०० ते सव्वाशेच्या घरात गेलेला आहे. आपल्या करड्या आवाजात धावते समालोचन करण्याची खासियत सुरेश जाधव यांच्याकडे आहे. कुस्ती मैदान चालू असताना चालु कुस्तीची माहिती देणे. डाव प्रति डावाची माहिती देणे. तसेच, मैदान चालू असताना जुन्या पैलवानांचे वस्तादांचे संतांचे समाजसुधारकांचे जीवनपट उलगडून सांगणारे सुरेश जाधव कुस्तीशौकीनांसाठी स्फुर्तीदायी व्यक्तीमत्त्व आहे.
निरपेक्ष भावनेतून कुस्तीची सेवा…
जगजेत्या गामापासून ते ऑलिम्पिकवीर सुशीलकुमार व ऑलिंपिकविर खशाबा जाधव ते महाराष्ट्रकेसरी पै. अभिजीत कटके पर्यंतचा इतिहास जाधव यांच्या तोंडपाठ आहे. प्रत्येक खेळणा-या पैलवानच नाव व त्यांच्या तालमीच नाव वस्तादाचे नाव जाधव यांच्या तोंडपाठ आहे. मैदान चालू झालेपासून मैदान संपेपर्यंत माईकच्या माध्यमातून मैदानावर ‘कमांड’ ठेवण्यात जाधव यांचा हातखंडा आहे. सुरेश जाधव यांनी कुस्तीला वाहुन घेतले आहे. ते स्वतःता अविवाहित असल्यामुळे कुस्तीची मनोभावे सेवा करताना दिसतात. आजपर्यंत कुठेही मानधनाची आपेक्षा न करता आयोजक देईल त्या बिदागीत समाधान माणून जाधव हे कुस्तीची सेवा करत आहेत. जाधव यांच्या नम्र स्वभावामुळे पाटण, कराड, शिराळा, शाहूवाडी, वाळवा, या तालुक्यांत मोठा जिव्हाळा तयार केलेला आहे. अनेक गावात कुस्त्यांची मैदाने व कुस्ती स्पर्धा यशस्वी पार पडन्या साठी सुरेश जाधव यांच मोलाचे सहकार्य आहे.
पैलवान सुरेश जाधव यांना मिळलेले पुरस्कार:
- पाटण तालुका आदर्श कुस्ती निवेदक
- मेनी ग्रामस्थांच्या वतीने ‘निनाई भूषण’
- सोंडोली ग्रामस्थांच्या वतीने ‘वारणा श्री’