कुमारस्वामी काँग्रेसच्या एटीएमचे ‘चीफ मॅनेजर’- भाजपा

नवी दिल्ली : जनता नव्हे तर काँग्रेसच्या कृपेवर माझे सरकार अवलंबून असल्याचे केलेले विधान कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना चांगलेच महागात पडताना दिसत आहे. भाजपा नेत्यांनी त्यांच्या विधानाचा समाचार घेत टीका केली आहे. कुमारस्वामी हे राज्यात काँग्रेसच्या एटीएमचे ‘चीफ मॅनेजर’ असून गांधी परिवाराच्या चरणात ते लीन आहेत, असा टोला भाजपा प्रवक्ते संबित पात्रा यांनी लगावला आहे.
केंद्रीय मंत्री डीव्ही सदानंद गौडा यांनी ट्विट करत कुमारस्वामी यांच्यावर निशाणा साधला आहे. सत्तेत टिकून राहण्यासाठी कन्नड लोकांशी समजोता करणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. कुमारस्वामी, कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणत आहेत, ते सहा कोटी कन्नड लोक नव्हे तर काँग्रेसचे ऋणी आहेत. श्रीमान, मी तुम्हाला विचारू इच्छितो की, तुम्ही सत्तेत टिकून राहण्यासाठी कन्नड लोकांच्या हिताशी समजोता करू इच्छिता, भ्रष्टाचारी काँग्रेससाठी तुमची स्थानिक भूमिका काय आहे ? कुमारस्वामींनी इतके खालच्या दर्जाला जायची गरज नव्हती, असेही त्यांनी म्हटले आहे.