कुमारस्वामींच्या शपथविधीला केजरीवालही उपस्थित राहणार
नवी दिल्ली – माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या निमंत्रणानुसार दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे बुधवारी बंगळूरू येथे होणाऱ्या कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहोळ्याला उपस्थित राहणार आहेत. आम आदमी पक्षाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. या शपथविधी सोहोळ्यासाठी देशातल्या बहुतेक सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुखांना निमंत्रणे देण्यात आली आहेत. त्यात आम आदमी पक्षाचाही समावेश करण्यात आला आहे.
आत्तापर्यंत बहुतांशी मुख्य प्रवाहातील राजकीय पक्षांशी आम आदमी पक्ष हा फटकून राहिला होता. व अन्य पक्षांनीही त्यांच्याशी जवळीक साधण्याचे टाळले होते. पण अलिकडच्या काळात भाजप विरोधी राजकीय पक्षांच्या आघाडीतील केजरीवाल यांचा वावर वाढला आहे. राजकीयदृष्ट्या त्याला महत्व दिले जात आहे. केजरीवालांना मोदी सरकारच्या एकाधिकारशाहीचा मोठा फटका बसला आहे. त्यांच्यावर होत असलेल्या या दडपशाहीला विरोध करण्यासाठी अन्य राजकीय पक्षांशी जवळीक साधणे केजरीवालांना आवश्यक वाटू लागले आहे. त्यातूनच त्यांनी हा निर्णय घेतला असावा असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे.