‘किंग इन बॅड टाइम’ विजय मल्ल्या खर्चासाठी पत्नी, मुलांवर अवलंबून

एकेकाळचा ‘किंग ऑफ गुड टाइम्स’ अब्जोपती विजय मल्ल्या आता दिवाळखोर झाला असून त्याला रोजचे खर्च भागवण्यासाठी भागीदार, पत्नी, व्यक्तीगत सहाय्यक, व्यावसायिक परिचित आणि मुलांवर अवलंबून रहावे लागत आहे. मल्ल्या विरोधात खटला दाखल करणाऱ्या १३ भारतीय बँकांनी लंडन न्यायालायला ही माहिती दिली आहे.
विजय मल्ल्याची पार्टनर/पत्नी पिंकी लालवानी वर्षाला १.३५ कोटी रुपये कमवते. मल्ल्याकडे आता फक्त २,९५६ कोटींची व्यक्तीगत संपत्ती उरली आहे. ही सर्व संपत्ती त्याने कर्नाटक उच्च न्यायालयासमोर सेटलमेंटसाठी ठेवली आहे. १३ भारतीय बँकांनी ११ सप्टेंबर २०१८ रोजी मल्ल्या विरोधात दाखल केलेल्या दिवाळखोरी याचिकेला उत्तर देताना त्याने ही माहिती दिली आहे.
डिसेंबर २०१९ मध्ये यावर सुनावणी होणार आहे. आपले खर्च भागवण्यासाठी आता आपण पत्नी आणि मुलांवर अवलंबून आहोत असे मल्ल्याने दाखवले आहे. विजय मल्ल्याकडून मिळालेल्या या उत्तराची भारतीय बँकांनी लंडन कोर्टाला माहिती दिली आहे. मल्ल्याने व्यक्तीगत सहाय्यक महाल आणि व्यावसायिक परिचित बेदी यांच्याकडून अनुक्रमे ७५.७ लाख आणि १.१५ कोटी रुपये उधारीवर घेतले आहेत.
रोजचे खर्च भागवण्यासाठी आणि कर्ज फेडण्यासाठी त्याने हे पैसे घेतले आहेत. लंडन कोर्टात १३ भारतीय बँकांचे प्रतिनिधीत्व करणारे वकिल निजेल तोजी यांनी लंडन न्यायालयाला ही माहिती दिली. मल्ल्याने या १३ भारतीय बँकांकडून ११ हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतले आहे. मल्ल्यावर अजून अनेक देणी बाकी आहेत. मल्ल्याला एचएमआरसीचे २.४० कोटी रुपये भरायचे असून आधीचा वकिल मॅसफारलेन्सची फी सुद्धा पूर्ण दिलेली नाही. काही दिवसांपूर्वी जेट एअरवेजला वाचवण्यासाठी पैसे देण्याची भाषा करणाऱ्या विजय मल्ल्याने आपण कर्जाखाली आहोत असे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे.