कासारवाडीतील मुलाच्या मृत्यू जबाबदार असणा-या अधिका-यावर गुन्हा दाखल करा

- विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी मागणी
पिंपरी – कासारवाडी येथील यशवंत प्राईड सोसायटी परिसरात ड्रेनेजचे काम करताना सीमाभिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका मुलाचा मृत्यू झाला. त्या मुलाच्या मृत्यू जबाबदार असणा-या महापालिकेच्या जलनिःस्सारण विभागातील संबंधित अधिकारी व ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, त्या मुलाच्या नातेवाईकांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली.
याबाबत महापालिका आयुक्तांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, महानगरपालिकेचे जलनिःस्सारण नलिका टाकण्याचे काम चालू आहे. या ठिकाणी जेसीबीने खोदकाम करताना यशवंत प्राईड सोसायटी इमारतीची सिमाभिंत कोसळली. त्या भिंती खाली एका मुलासह दोन मजुर अडकले होते. त्यात लोकेश ठाकूर हा मुलगा गंभीर जखमी होवून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर अपघातामध्ये इतर दोन मजुर जखमी झालेले आहेत. ते मनपाच्या वाय.सी.एम. रुग्णालयामध्ये उपचार करीत आहेत.
सुकृतदर्शनी या अपघातामध्ये मनपाचा ठेकेदार व मनपाचे अधिकारी दोषी असल्याचे दिसून येते. हे काम करीत असताना कुठल्याही प्रकारची सुरक्षितेची साधने वापरण्यात आली नव्हती. कसल्याही प्रकारचे बॅरीकेटस् लावण्यात आले नव्हते. त्यामुळे या चिमुरड्याचा मृत्यू झालेला आहे. व नाहक दोन गरीब मजुर जखमी झालेले आहेत.
या अपघातासाठी संबंधित ठेकेदार व मनपा अधिकारी यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी, त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा. तसेच जखमींना व मृत्यू पडलेल्या मुलास मनपामार्फत योग्य ती नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी साने यांनी केली.