breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कारभा-यांनी ठरविलेली यादीच अंतिम ; भाजपमध्ये जून्या-नव्यांचा वाद उफाळला

पिंपरी-  पिंपरी-चिंचवड शहरात भारतीय जनता पार्टी जिवंत ठेवणा-या निष्ठावंत जून्या कार्यकर्त्यांना पावलोपावली भाजपमध्ये दाखल झालेली नेतेमंडळी अपमानस्पद वागणूक देत आहेत.  महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेतील तिकिट वाटपापासून सुरु झालेला खेळ आजही सुरु आहे. नवख्या व मर्जीतील कार्यकर्त्यांना प्रभाग समितीच्या स्विकृत सदस्य पदी संधी दिल्याने जून्या कार्यकर्त्यांना नेतेमंडळी सापत्न वागणूक देत आहे. त्यामुळेच प्रभाग समिती सदस्य निवडण्यासाठी बुधवारी (दि.25) रात्री पिंपरीतील एका हाॅटेलवर झालेल्या बैठकीत चांगलीच खडाजंगी झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपमध्ये पुन्हा एकदा जून्या – नव्या कार्यकर्त्यांचा वाद उफाळून आला आहे.

महापालिकेच्या अ, ब, क, ड, ई, फ, ग आणि ह या आठही प्रभाग समितीवर प्रत्येक तीन याप्रमाणे 24 जागेवर स्विकृत सदस्य निवडण्यात येणार होते. या 24 जागेसाठी 121 उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महापालिकेवर सत्ताधारी भाजपचे वर्चस्व राहिल्याने प्रभागातील 24 जागेवर त्यांचे सदस्यांना संधी देण्यात येणार होती. परंतू, भाजपने सामाजिक कार्यकर्त्यांना डावलून त्यांच्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे.

दरम्यान, प्रभाग समितीवर स्विकृत सदस्य निवड करण्यासाठी पिंपरीतील एका सहकारी बॅंकेच्या पदाधिका-यांच्या घरी ही बैठक घेण्यात आली.  त्या बैठकीत प्रभाग समितीवर कोणाची वर्णी लावायची, हे निश्चित करण्यात आले. त्यानंतर पक्षाचा प्रोटोकाॅल म्हणून शहर भाजपच्या पदाधिका-याची बैठक एका खासगी हाॅटेलमध्ये घेतली. त्यावेळी प्रभाग समिती स्विकृत सदस्यांची नावे निश्चित केल्याने त्यावर चर्चा करताना उपस्थित पदाधिका-यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. त्यात जू्न्या कार्यकर्त्यांना संधी द्यावी, म्हणून भाजपमधील काही पदाधिका-यांनी कारभा-याकडे आग्रह धरला. परंतू, पक्षाच्या बैठकीअगोदर निश्चित झालेली नावेच अंतिम करण्यात आल्याने नव्या-जून्याचा वाद उफाळून आला. तसेच अजून किती दिवस पक्ष जिवंत ठेवणा-या कार्यकर्त्यांवर अन्याय करणार, असा सवाल काहींनी नेत्यांना विचारला आहे. त्यामुळे जून्या कार्यकर्त्यांनी बंडाचे निशाण फडकावित कारभारी नेत्यांच्या विरोधात पिंपरीत आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button