कामशेतजवळ होंडा मोटारीची बसला धडक; पाच ठार; सहा जखमी

लाोणावळा : मुंबईच्या दिशेने जाणा-या होंडा मोबिलो गाडीची धडक पुढे जाणा-या व्होल्वो बसला बसली. या अपघातात होंडा गाडीतील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यामुळे या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून महामार्ग पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. हा अपघात कामशेत बोगद्याजवळ 77 किलोमीटर अंतरावर झाला.
भगिनी देशमुख (वय-60), श्रद्धा निलेश पाटील (वय-19), दत्तात्रय देशमुख (वय-63), कार चालक दीपक (संपूर्ण नाव समजू शकले नाही), अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. रुपेश दत्तात्रय देशमुख (वय-34, रा. विरार मुंबई), संजय पाटील (वय-15), ओम देशमुख (वय 2 वर्षे), राखी निलेश पाटील (वय-38), राहुल देशमुख, रुपाली देशमुख अशी गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत.
कामशेत बोगद्याजवळ भरधाव वेगात जाणा-या होंडा मोबिलो कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे गाडी पुढे जाणा-या व्होल्वो बसला पाठीमागून धडक दिली. कारमध्ये नऊजण प्रवास करत होते. या अपघातात ओम देशमुख हा दोन वर्षांचा मुलगा बचावला असून त्याच्यावर लोकमान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर त्याचे आई-वडील राहुल आणि रुपाली देशमुख यांच्यावर तळेगाव दाभाडे येथील रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांना किरकोळ स्वरुपाच्या जखमा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
महामार्ग पोलिसांकडून अपघातग्रस्त वाहने बाजूला काढण्याचे काम सुरू असून एका लेनवरून वाहतूक धिम्या गतीने सुरू हाोती.