कामगार नेते शैलेश चोगले यांचे अपघाती निधन; पार्थ पवार यांच्याकडून कुटुंबियांचे सांत्वन

- लोकसभा प्रचाराच्या धावपळीतून काढला वेळ
- कामगारांचा सच्चा नेता हरपल्याने व्यक्त केली हळहळ
खालापूर – सावरोली (ता. खालापूर) येथील कोप्राण फार्मा कारखान्यातील कामगार प्रतिनिधी व नाटककार शैलेश चोगले यांचे रविवारी दुचाकीवर जात असताना अपघात झाला. रुग्णालयात उपचार सुरू घेत असताना मृत्युशी त्यांची झुंज कायम सुरूच होती. अखेर मंगळवारी सायंकाळी प्राणज्योत मावळली. त्यांच्या जाण्याने खालापूर येथील कामगार क्षेत्र आणि कला क्षेत्र पोरकं झालं आहे. ही माहिती कळताच मावळ लोकसभेच्या झंझावाती प्रचारात आहोरात्र व्यग्र असलेले आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांनी तत्काळ सावरोली येथील चोगले यांच्या घरी भेट दिली. त्यांच्या दुःखात सहभागी होऊन पवार यांनी कुटुंबियांचे सांत्वन केले.
चोगले हे कोप्रान फार्मास्युटीकल कंपनीत कार्यरत होते. मुळ सावरोलीचे असलेले चोगले हे सध्या खोपोलीच्या आर. डी. नगर येथे वास्तव्यास होते. रविवारी ते खोपोलीकडे जाताना खालापूर- पेण मार्गावर सावरोली गावाजवळ ट्रकला ठोकर बसून त्यांचा अपघात झाला. त्यांना गंभीर दुखापत झाल्याने एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मंगळवारी त्यांची प्राणज्योत मावळली. या घटनेमुळे कामगार क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, खालापूर परिसरात महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार प्रचारानिमित्त भेटीगाठी घेत होते. त्यांना कामगार नेता शैलेश चोगले यांचा अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समजली. त्यानंतर पार्थ पवार यांनी चोगले यांच्या सावरोली गावी जावून कुटूंबियाची भेट घेतली. त्यांच्या दुःखात सहभागी होवून कुटूंबियांचे सांत्वन केले. तसेच, शैलेश चोगले यांना श्रध्दाजंली अर्पण केली. तसेच, कामगारांच्या न्याय हक्कांसाठी लढणारा नेता अशी चोरगे यांची ओळख होती. अचानक चोरगे कुटूंबियावर कोसळलेल्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत. या संकटातून बाहेर पडण्याची शक्ती त्यांना देवो, अशी ईश्वरांकडे प्रार्थना करून कामगारांचा सच्चा नेता हरपल्याची हळहळ पार्थ पवार यांनी व्यक्त केली.