कामगारांचे प्रश्न सोडविण्याची जबाबदारी खासदार म्हणून पार्थ पवार यांची राहील – नवाब मलीक

कळंबोली, (महा-ई-न्यूज) – केंद्रातील आणि राज्यातील सत्ताधारी भाजपच्या कार्यकाळात माथाडी कामगारांवर मोठा अन्याय झाला आहे. कामगारांना रस्त्यावर आणून मालक वर्गासाठी सुरक्षीत कायदा बनविण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. माथाडी कायदाच संपविण्याच्या कुरापती हे सरकार करत असल्याने कामगारांवर भाजप आणि शिवसेनेमुळे मोठे संकट येणार आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ता नवाब मलीक यांनी आज केला.
मावळ लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित कळंबोली येथील मुंबई महानगर लोखंड व पोलाद बाजार समितीच्या वतीने पार्थ पवार यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मलीक बोलत होते. बाजार समितीचे सभापती गुलाबराव जगताप, आमदार बाळाराम पाटील, पनवेल महापालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, माथाडी कामगार संघटनेचे नेते बाळा मराठे, विजय खाणावकर, रवी भगत, सुनिल घरत, नगरसेवक गोपाळ भगत, संपतराव गोडसे, राष्ट्रवादीचे पनवेल शहर जिल्हाध्यक्ष सतीश पाटील, सातारा युवक अध्यक्ष तेजस शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
नवाब मलीक म्हणाले की, आम्ही कामगार आहोत म्हणून या लोकांकडून दमदाटी केली जाते. कामगार असल्याचे भासवून माथाडी कामगारांचे काम ठेकेदाराला मिळावे यासाठी कामगारांवर दबाव आणला जात आहे. माथाडी कामगारांना उध्वस्त करण्यासाठी हे सरकार वाट्टेल ते प्रयत्न करत आहे. जेएनपीटीवर आधारलेले उद्योग गुजरातमध्ये नेण्यासाठी मोदी प्रयत्न करत आहेत, असा आरोप मलीक यांनी केला.
कळंबोली एमआयडीसीत पश्चिम महाराष्ट्रारातील कामगार वर्ग काम करतो. पूर्वी याठिकाणी शिवसेनेची सत्ता होती. तर, कामगारांच्या गावाकडे राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यामुळे राष्ट्रवादीवर प्रेम करणारा कामगार वर्ग आता याठिकाणी कामासाठी स्थायीक झाला आहे. यापुढे याठिकाणीही राष्ट्रवादीच राहणार आणि गावाकडे देखील राष्ट्रवादीचीच सत्ता असणार, असा निर्धात येथील कामगारांनी केला आहे. कारण, या कामगारांना पार्थ पवार यांच्या माध्यमातून युवा नेतृत्व मिळाले आहे. केंद्रात कामगारांचे सर्व प्रश्न मांडून कामगारांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी एक सुशिक्षीत खासदार म्हणून पार्थ पवार यांची राहील, असा विश्वास त्यांनी कामगारांना दिला.