काँग्रेस – राष्ट्रवादी महाआघाडीला लक्षणीय बहुमत मिळेल : पी चिदंबरम

मुंबई : देशात पहिल्या तीन टप्प्यात आतापर्यंत ३०३ मतदारसंघात मतदान पार पडलेले आहे. पहिल्या ३ टप्प्यातील निकालाचे अंदाज पाहता काँग्रेस पक्षाला या लोकसभा निवडणुकीत भाजपएवढेच यश मिळेल. याचाच अर्थ काँग्रेसच्या जागांवर लक्षणीय वाढ होईल आणि भाजपाला खूप मोठा फटका बसणार आहे. महाराष्ट्रातील काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीला लक्षणीय बहुमत मिळेल, असे मत माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी मांडले.
चिदंबरम शनिवारी मुंबई दौ-यावर होते. त्यावेळी त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण, एआयसीसी सचिव आशिष दुआ आणि माजी आमदार चरणसिंग सप्रा उपस्थित होते.
पी. चिदंबरम म्हणाले म्हणाले की, या निवडणुकीच्या निमित्ताने हे स्पष्टपणे दिसत आहे की देशातील जनतेने जुमलेबाज भाजपाला साफ नाकारलेले आहे. आपला हा देश सुरक्षित आहे, आपण सुरक्षित आहोत ते आपल्या सैन्य, नौदल आणि वायुसेना यांच्या मुळे ५६ इंच छाती सांगणाऱ्या माणसामुळे नाही. आपल्या देशाची जनता नोटबंदी आणि जीएसटीमुळे त्रासलेले आहेत, त्यांनी या दोन गोष्टींच्या विरोधात मतदान केलेले आहे. लोकांनी काँग्रेसला भरभरून मतदान केलेले आहे. काँग्रेसचे सरकार आल्यावर आम्ही पुन्हा देशाला प्रगतीकडे नेऊ. शेतकरी कर्जमाफी करू. शेतक-यांच्या समस्या समजून घेऊ आणि त्या सोडवू. २४ लाख रोजगार तात्काळ सरकारी नोकऱ्या देऊ. तसेच ५ करोड दारिद्र रेषेखालील गरीब कुटुंबांना वर्षाला ७२ हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करू म्हणजेच गरिबी दूर करू. विद्यार्थ्यांना सुलभ कर्ज योजना देऊ. नवीन उद्योग धंद्यांना चालना देऊ. महिला, दलित, अल्पसंख्यांक, विद्यार्थी आणि पत्रकार यांना संपूर्ण सुरक्षा देऊ. आम्ही तपास यंत्रणा आणि सरकारी संस्थांचा गैरवापर होणार नाही याकडे विशेष लक्ष देऊ. काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील सर्व वचने आम्ही पूर्ण करू, अशी आश्वासने चिदंबरम यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, भाजपने २०१४ च्या निवडणुकीत जनतेला दिलेल्या एका ही आश्वासनांची पूर्तता केलेली नाही. त्यांनी एक ही गोष्ट करून दाखवली नाही. १५ लाख खात्यात जमा होणार होते ? वर्षाला २ करोड नोकऱ्या देणार होते ? शेतकरयांना नफा मिळवून देणार होते ? या सगळ्याचे काय झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता ‘अच्छे दिन’ वर बोलत नाहीत. ते आपल्या भाषणांमध्ये विकासाच्या गोष्टींवर बोलत नाहीत, मूळ मुद्द्यांवर बोलत नाहीत. २०१४ ला दिलेल्या आश्वासनांवर बोलत नाहीत. भाजप सरकारने भारताची अर्थव्यवस्था कोलमडून टाकली. CMIE या अहवालानुसार बेरोजगारीचा दर ८.४ % एवढा वाढलेला आहे. गेल्या ५० वर्षातील हा सर्वात जास्त दर आहे. शेतकरी वर्गाची अवस्था वाईट झालेली आहे. उद्योजक, व्यापारी तसेच सर्व क्षेत्रातील लोक भाजपवर नाराज आहेत. स्वातंत्र्य, लोकशाही, संविधान धोक्यात आलेले आहे. लोक आता समजून चुकलेले आहेत कि भाजप आणि आरएसएस कडून धोका आहे.
पी चिदंबरम म्हणाले की, मी आज मुंबईत आलेलो आहे ते मुंबई व महाराष्ट्र आणि उर्वरित भारतातील जनता येणाऱ्या सोमवारी, २९ एप्रिल २०१९ रोजी मतदान करणार आहेत तेव्हा त्यांनी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस या महाआघाडीला मतदार करावे असे मी आवाहन करत आहे. महाराष्ट्रामध्ये ३ टप्प्यातील मतदान पार पडलेले आहे. काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीला लक्षणीय बहुमत मिळेल. भाजप पेक्षा महाआघाडी वरचढ होणार आहे, असेही खासदार चिदंबरम म्हणाले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की, धुळ्याला सुरेश प्रभू यांच्या खाजगी विमानातून एक मोठी काळी पेटी खाली उतरवून त्यांचे सहकारी घेऊन जातानाचा व्हिडिओ संपूर्ण जगाने पाहिलेला आहे. ते म्हणतात कि त्यामध्ये आंबे होते पण हे साफ खोटे आहे. ती आंब्याची पेटी वाटत नाही. ती आंब्याची पेटी नव्हती. मी निवडणूक आयोगाकडे मागणी करतो कि त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि ताबडतोब योग्य ती कठोर कारवाई करावी.