breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

काँग्रेसकडून मला जातीवाचक शिव्या, मोदींचा आरोप, कुटुंबाबाबत पवारांना उत्तर

सोलापूर – “काँग्रेसने मला जातिवाचक शिव्या दिल्या. मला शिव्या द्या मी सहन करत आलोय. आता तर ते सर्व मागसलेल्यांना चोर म्हणतात, मात्र मी ते सहन करणार नाही, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. सोलापुरातील अकलूज इथं मोदींची जाहीर सभा झाली. या सभेत मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पुन्हा एकदा हल्ला चढवला. याशिवाय काँग्रेसवरही टीकास्त्र सोडलं.

‘शरद पवार यांना वाऱ्याची दिशा लक्षात आली. ते असं कधीच काही करत नाहीत, ज्यातून त्यांचं नुकसान होईल. वाऱ्याची दिशा बदलत असल्याचं लक्षात आल्याने शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली,’ असं म्हणत माढ्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

मी मागासलेल्या समाजाचा आहे म्हणून हे सर्व सहन करत आलो. शरदराव मला माहित आहे तुम्ही मोदींच्या मार्गावर चालू शकणार नाही. ते तुम्हाला जाणारही नाही. तुम्ही दिल्लीतील एका परिवाराची सेवा करता, असा घणाघात मोदींनी केला.

काँग्रेसच्या नामादारने देशातील चौकीदारांना चोर म्हटलं. सर्व चौकीदार मैदानात उतरल्यानंतर त्यांचं तोंड बंद झालं, असं मोदी म्हणाले.

शरद पवार मला परिवार नाही म्हणतात. या देशातील जनता हाच माझा परिवार आहे. कुटुंबव्यवस्था ही देशाची ताकद आहे, देशाचा गौरव आहे. कुटुंब व्यवस्थेकडून प्रेरणा घेऊनच आयुष्याची वाटचाल सुरु आहे. भगतसिंह, राजगुरु, सुखदेव, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल, वीर सावरकर यासर्वांचं मोठं कुटुंब होतं. हीच कुटुंबव्यवस्था आमची प्रेरणा आहे, असं मोदी म्हणाले.

‘यशवंतरावांकडून प्रेरणा घ्या’

शरद पवारांनी यशवंतराव चव्हणांकडून प्रेरणा घ्यायला हवी होती. कृषीमंत्री असताना शरद पवार अनेक योजना आणू शकले असते, मात्र पवार फक्त स्वत:चे साखर कारखाने सांभळत राहिले, असा आरोप मोदींनी केला.

..म्हणून पवारांनी मैदान सोडले

मला आता समजले की शरदरावांनी मैदान का सोडलं. ते वेळेआधी हवेची दिशा ओळखतात. ते कधी स्वत:चं नुकसान होऊ देत नाहीत. त्यामुळेच त्यांनी माढ्याचं मैदान सोडलं, असा घणाघात मोदींनी शरद पवारांवर केला.

काळ्या पैशावर हल्ला

भ्रष्टाचार आणि काळ्या पैशावर थेट हल्ला केला. मात्र विरोधकांचं मोदी हटाव हे एकच ध्येय आहे. मात्र देशाचं नाव उंच कसं होईल, याचा विचार कोणीच करत नाही, असं मोदी म्हणाले.

जनतेचा विश्वास हीच संपत्ती

तुम्ही मला प्रत्येक निर्णयासाठी शक्ती दिली. मोदींच्या हातामध्ये सरकार देण्यासाठी जनता स्वत: प्रचार करत आहे. तुमचा विश्वास हीच माझी संपत्ती आहे. मी तुमचा विश्वास कमावला आहे, अजून काही नाही, असं मोदींनी नमूद केलं.

आधी किती भ्रष्ट्रचार झाले, पण तुमच्या प्रधान सेवकाने 5 वर्षे सरकार चालवलं, मात्र भ्रष्टाचाराचा एकही डाग लावून घेतला नाही, असा दावा त्यांनी केला.

मोहिते पाटलांचा सत्कार

यावेळी माढ्याचे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या 75 व्या वाढदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचा सत्कार केला आणि शुभेच्छा दिल्या. विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी याधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, विजयसिंह मोहिते पाटील आणि भाजप-शिवसेना युतीच्या बारामतीतील उमेदवार कांचन कुलही उपस्थित होत्या.

माढ्यात चुरस

माढा लोकसभा मतदारसंघात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होत आहे. शिवसेना-भाजप युतीकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर काँग्रेस राष्ट्रवादीने संजय शिंदे यांना निवडणूक मैदानात उतरवले आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीनेही (VBA) माढ्यातून अ‍ॅड. विजय मोरे यांना तिकीट दिले आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपने माढा जिंकण्याचा चंग बांधला आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अकलूजमध्ये सभा घेत आहेत.

अकलूज येथील सभेचा परिणाम माढासह बारामती मतदारसंघातही होईल, असा विश्वास भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आघाडीत माढा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे, तर युतीत हा मतदारसंघ भाजपकडे आहे. माढ्यातून राष्ट्रवादीने विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांना उमेदवारी दिली आहे. शिंदे आणि मोहिते कुटुंबाचं सोलापूर जिल्ह्यात जमत नाही. त्यामुळे ही लोकसभा निवडणूक आता रंगतदार होणार आहे.

सभेत अकलूजमधील सभेसाठी 2 लाख नागरिक उपस्थित बसू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली होती. अकलूजमधील 27 एकरच्या जय पार्कमध्ये ही व्यवस्था करण्यात आली. माढा लोकसभा मतदारसंघात सांगोला, माण खटाव, माळशिरस, करमाळासारखे दुष्काळी तालुके आहेत. मोहिते पाटील यांनी कृष्णा भीमा स्थिरीकरण योजना पूर्ण होण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला, तर माण खटावसाठी जिहे काठापूर, उरमोडी, सांगोलसाठी टेंभू म्हैसाळ, नीरा भाटघर, आणि उजनी धरणातील पाण्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे.

माढ्याचा तिढा

माढ्याच्या जागेवरुन गेल्या महिन्या-दोन महिन्यात प्रचंड राजकीय हालचाली झाली. माढ्याचे राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार असलेल्या विजयसिंह मोहिते पाटलांची तिकीट कापून, त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लढण्याचे ठरवले. मात्र, त्यानंतर एकाच घरातील तिघे निवडणुकीच्या रिंगणात नको, असे कारण देत शरद पवारांनी माढ्यातून माघार घेतली. मात्र, त्यांच्या माघारीमागे मोहित पाटलांची नाराजी असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरु आहे. त्यानंतर काहीच दिवसात विजयसिंह मोहिते पाटील यांचे सुपुत्र रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आता विजयसिंह मोहिते पाटील हेही भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button