कलबुर्गी हत्या प्रकरणातही चिंचवडच्या अमोल काळेचा सहभाग ?

पुणे – गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक झालेल्या हिंदू जनजागृती समितीशी संबंधित अमोल काळेचा प्राध्यापक एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्या प्रकरणातही सहभाग असल्याची माहिती तपासातून समोर येत आहे. कलबुर्गी यांच्या घरात गेलेल्या दोन हल्लेखोरांपैकी एक जण अमोल काळे होता. कलबुर्गी कुटुंबातील एका व्यक्तीने अमोल काळेची ओळख पटवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी काही दिवसांपूर्वी चार जणांना अटक करण्यात आली होती. सुजितकुमार ऊर्फ प्रवीण, अमोल काळे उर्फ भाईसाहेब, अमित डेगवेकर ऊर्फ प्रदीप आणि मनोहर इडावे अशी या चौघांची नावे आहेत. यातील अमोल काळे हा चिंचवडचा रहिवासी असून चौघेही आरोपी सनातन संस्था आणि त्यांच्याशी संबंधित हिंदू जनजागृती समितीशी संबंधित आहेत.
अमोल काळेचा कलबुर्गी हत्या प्रकरणातही सहभाग असल्याची माहिती आता समोर येत आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार कलबुर्गी यांच्या घरी गेलेल्या दोन हल्लेखोरांमध्ये अमोल काळेचा समावेश होता. गौरी लंकेश प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने दिलेल्या माहितीनुसार कलबुर्गी यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीने अमोल काळेची ओळख पटवली आहे.
एम. एम. कलबुर्गी यांची ३० ऑगस्ट २०१५ रोजी पहाटे दोन अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून निर्घृण हत्या केली होती. हल्लेखोरांनी अगदी जवळून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांचा दरवाजा ठोठावला. कलबुर्गी यांनी दरवाजा उघडताच त्यांना गोळ्या घालण्यात आल्या. या दोन हल्लेखोरांपैकी एक अमोल काळे होता, अशी माहिती समोर आली आहे. आता याबाबतची माहिती एसआयटीने कलबुर्गी प्रकरणाचा तपास करणाऱ्या पथकाला दिली आहे. पुरावे गोळा केल्यावरच याबाबत माहिती दिली जाईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले. अमोल काळे हा त्याच्या आई आणि पत्नीसह चिंचवडमध्ये राहतो. त्याच्या आणखी एका साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.