breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

कर्मचाऱ्यांचे बजेट कोलमडले!

‘जेट एअरवेज’चे कर्मचारी हवालदिल;  विमानसेवा थांबल्याने बेरोजगारी, थकीत वेतनाचे संकट

आर्थिक डबघाईला आल्यामुळे विमानसेवा बंद करण्यात आलेल्या जेट एअरवेजच्या कर्मचाऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून वेतनाला वंचित असलेल्या या कर्मचाऱ्यांसमोर आता बेरोजगारीचे संकट उभे आहे. एकीकडे, कंपनी व्यवस्थापनाने चर्चेस दिलेला नकार आणि दुसरीकडे, सरकारने केलेले दुर्लक्ष यांमुळे संतप्त झालेल्या जेट कर्मचाऱ्यांनी गुरुवारी मुंबईतील कंपनीच्या कार्यालयासमोर आंदोलन केले.

जेट एअरवेजची सेवा बुधवारी मध्यरात्रीपासून बंद करण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने यावर तोडगा काढण्यासाठी जेट कर्मचाऱ्यांनी अंधेरीतील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनच केले. या वेळी एअर होस्टेस, केबिन क्रू, कस्टमर सर्विस, कागरे विभाग इत्यादी कर्मचारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. ऑल इंडिया जेट एअरवेज स्टाफ ऑफिसर आणि स्टाफ असोसिएशनची जेट व्यवस्थापनासोबत बैठक झाली. त्या वेळी व्यवस्थापन नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. १० मेपर्यंत जेटच्या हिस्सा विक्री प्रक्रियेची अंतिम मुदत असून तोपर्यंत कर्मचाऱ्यांना प्रतीक्षाच करावी लागणार आहे. ही माहिती समजताच उपस्थित कर्मचाऱ्यांनी कार्यालयासमोर ठिय्या देऊन घोषणाबाजीच सुरू केली. सरकार यात हस्तक्षेप का करत नाही, मदत नाही तर मत नाही अशी भूमिका काही कर्मचाऱ्यांनी घेतली. व्यवस्थापनाने तोडगा काढा, व्यवस्थापनाने सामोरे जा, अशाच घोषणा या वेळी केल्या. या घोषणा देताना २० ते २५ वर्षे सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यातून अश्रूही येत होते. घोषणाबाजी करताना महिला कर्मचारीही आघाडीवर होत्या. घरखर्च, मुलांच्या गरजा भागवताना असलेले बँकांचे कर्ज फेडणार कसे असा प्रश्न कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात होता.

जेट एअरवेजमधील कर्मचाऱ्यांबरोबरच या कंपनीशी निगडित असलेल्या काही कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाचाही प्रश्न लटकलेला आहे. विविध सेवा पुरवणाऱ्या चार कंत्राटी कर्मचारी कंपन्यांचे कर्मचारीही जेटसोबत आहेत. हेल्पर, प्रवाशांच्या बॅगांना टॅग लावणे, काऊंटरवर चेकिंगसाठी मदत, सामान लोड करण्यासह जवळपास ५०० पेक्षा अधिक कर्मचारी यात येतात. जेटला आर्थिक समस्या जरी येत असली तरी कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कंपन्यांकडून वेळेत वेतन दिले जात होते. मात्र कंपनी बंद होत असल्याने आता या कर्मचाऱ्यांचा वेतनाचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. या महिन्याचे व त्यापुढील महिन्याचे वेतन कसे मिळणार हा प्रश्नच आहे.

 

कर्मचाऱ्यांसाठी ‘उरी’ चित्रपट

मुंबई विमानतळावरील जेट एअरवेजच्या ४० काऊंटरपैकी फक्त चार काऊंटरच सुरू ठेवण्यात आले आहेत. हे बंद पडलेले कक्ष अन्य विमान कंपन्यांचे कर्मचारी वापरत असल्याची माहिती एका कर्मचाऱ्याने दिली. एकीकडे, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना व्यवस्थापन उत्तरे देत नसताना विमानतळावरील जेटच्या कर्मचारी कक्षात ‘उरी’ व अन्य चित्रपट मात्र, दिवसभर दाखवले जात होते.

स्टेशन ते ऑफिस खासगी बस सेवा बंद

जेट व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे स्थानक ते ऑफिस ते स्थानक अशी असलेली खासगी बस सुविधाही बंद केली आहे. अंधेरी, घाटकोपर, कुर्ला, वाशी येथून या सेवा आहेत. मात्र त्या बंद केल्याबद्दलही कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला.

मी विरारमध्ये राहतो व गेली २५ वर्षे जेट एअरवेजमध्ये काम करत आहे. ही कंपनी बंद होणार हे ऐकून माझ्या पायाखालची वाळू सरकली आहे. दरमहा २५ हजार रुपये गृहकर्जाचा हप्ता भरावा लागतो. मुलीचे लग्न, मुलाचे शिक्षण बाकी आहे. आता संसाराची गाडी चालवायची कशी, असा प्रश्न उभा राहिला आहे.

– मुकेश अडसुळ, कस्टमर सर्विस,

पाच वर्षे झाली जेटमध्ये काम करत आहे. नोकरी गेली तरी दुसरीकडे प्रयत्न करणार. मात्र अशा प्रकारे कंपनी बंद होईल हे वाटले नाही. मात्र आमच्या हक्काचे जे काही आहे ते मिळाले पाहिजे. मदत नाही तर मत नाही, अशीच भूमिका मी व काही जणांनी घेतली आहे.

– प्रथमेश बेल्हेकर, कस्टमर सर्विस असोसिएट

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button