कर्नाटकात 6 मंत्रीपदे भरण्यासाठी राहुल गांधींशी चर्चा करणार…

मल्लिकार्जुन खर्गे यांची माहिती
बेंगळूरु – कर्नाटकातील कॉंग्रेस पक्षाच्या वाट्याची 6 रिक्त मंत्रीपदे भरण्यासंदर्भात कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत, असे लोकसभेतील कॉंग्रेसचे सभागृह नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले. कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या आघाडी सरकारमध्ये झालेल्या समझोत्यानुसार कॉंग्रेसच्यावाट्याला 22 आणि जेडीएसच्या वाट्याला 12 मंत्री असणार आहेत. कॉंग्रेसच्या वाट्याच्या 6 मंत्रीपदे रिक्त आहेत. या जागा आरक्षित कोट्यानुसार भरल्या जाणार आहेत.
कॉंग्रेसचे नेते एम.बी. पाटील आणि सतिश जरखोली यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान देण्यात आलेले नाही. त्यामुळे ते दोघेही नाराज आहेत. रोशन बेग, एन.ए. हॅरिस, रामलिंगा रेड्डी आणि एच.के. पाटील या कर्नाटकातील कॉंग्रेस नेत्यांमध्येही नाराजीचे वातावरण आहे. मात्र त्यांच्यापैकी एम.बी. पाटील आणि जरखोली हे उघडपणे आपली नाराजी व्यक्त करत आहेत. या नाराज नेत्यांची समजूत कशी काढणार असे विचारले असता, कॉंग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल आणि वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद हे या नेत्यांच्या संपर्कात आहेत आणि राहुल गांधी यांच्याबरोबर आपण चर्चा करणार असल्याचे खर्गे यांनी सांगितले.