कर्नाटकात खातेवाटपावर अडले जेडीएस – कॉंग्रेस आघाडीचे घोडे

- घासाघासीमुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडण्याची चिन्हे
बंगळूर – कर्नाटकातील सत्तारूढ जेडीएस-कॉंग्रेस आघाडीचे घोडे खातेवाटपावरून अडले आहे. खात्यांवरून सुरू झालेल्या घासाघासीमुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.
जेडीएसचे नेते एच.डी.कुमारस्वामी यांनी शुक्रवारी कर्नाटक विधानसभेत शक्तिपरीक्षा जिंकली. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराबाबतची चर्चा सुरू झाली. आतापर्यंत केवळ कुमारस्वामी (मुख्यमंत्री) आणि कॉंग्रेस नेते जी.परमेश्वर (उपमुख्यमंत्री) यांनी शपथ घेतली आहे. कुमारस्वामी सरकारने शक्तिपरीक्षेत बाजी मारल्याने मंत्रिमंडळ विस्ताराबाबतच्या हालचाली तातडीने होतील, अशी शक्यता होती. मात्र, खातेवाटपावरून आघाडीत पेच निर्माण झाल्याचे संकेत मिळत आहेत.
स्वत: कुमारस्वामी यांनी खातेवाटपासंदर्भात काही मुद्दे उद्भवल्याची कबुली आज पत्रकारांशी बोलताना दिली. अर्थात, त्या मुद्द्यांमुळे आघाडी सरकारला कुठला धोका नाही. राज्यातील कॉंग्रेस नेत्यांना खातेवाटपाविषयीची मंजुरी त्यांच्या श्रेष्ठींकडून मिळाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होईल, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
काल विधानसभेत कुमारस्वामी यांचे बहुमत सिद्ध झाल्यानंतर लगेचच जेडीएस आणि कॉंग्रेसमध्ये मंत्रिमंडळ विस्ताराविषयीची चर्चा सुरू झाली. त्यासंदर्भात कुमारस्वामी यांची कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते सिद्धरामय्या, परमेश्वर आणि कॉंग्रेसचे प्रभारी के.सी.वेणुगोपाल यांच्याबरोबर बैठक झाली. त्यानंतर सिद्धरामय्या, परमेश्वर आणि डी.के.कुमार हे कॉंग्रेस नेते आज दिल्लीला रवाना झाले. ते मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाबाबत यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याशी चर्चा करणार आहेत.
संख्याबळाच्या दृष्टीने कॉंग्रेस हा जेडीएसपेक्षा मोठा पक्ष आहे. कॉंग्रेसने केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रिपदासाठी पाठिंबा दिला. मोठा पक्ष या नात्याने कॉंग्रेसने अधिक मंत्रिपदे स्वत:कडे घेतली आहे. कॉंग्रेसला 22 तर जेडीएसला 12 मंत्रिपदे देण्याचा निर्णय याआधीच झाला आहे. आता महत्वाच्या खात्यांचा आग्रहही कॉंग्रेसने धरल्याचे वृत्त आहे. काही महत्वाची खाती स्वत:कडे ठेवण्यासाठी जेडीएस प्रयत्नशील आहे. त्यातून दोन्ही पक्षांत खातेवाटपावरून जोरदार घासाघीस सुरू असल्याचे समजते.