कर्नाटकातील शेतकऱ्यांना १५ दिवसांत मिळणार कर्जमाफी

बंगळूरू: राज्यातील शेतकऱ्यांना पंधरवड्यात संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल, अशी ग्वाही कर्नाटकचे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी दिली. धर्मनिरपेक्ष जनता दलाच्या (जेडीएस) निवडणूक जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना सत्तेवर येताच २४ तासांत संपूर्ण कर्जमाफीची ग्वाही देण्यात आली होती. ती पाळण्यात दिरंगाई होत असल्याबद्दल भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या पार्श्वभूमीवर कुमारस्वामींनी शेतकरी नेत्यांची बैठक घेतली. यावेळी उपमुख्यमंत्री परमेश्वर आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते भाजपचे गोविंदा करजोळाही सहभागी होते.
वित्तीय शिस्तीला धक्का न लागता शेतकऱ्यांचे पूर्ण हितरक्षण कसे करता येईल, याबाबत १५ दिवसांत ठोस निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हेदेखील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या बाजूने आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांच्यासह मी गांधी यांची भेट घेऊन चर्चा करणार आहे, असेही त्यांनी सांगितले.