breaking-newsराष्ट्रिय

कर्नाटकमधील राजकीय नाट्याची मिळमिळीत अखेर

  • लढतीविनाच कुमारस्वामी यांनी जिंकले विश्‍वासमत

  • विधानसभेतून भाजपचा सभात्याग

  • जेडीएस-कॉंग्रेस आघाडी सरकार सत्तारूढ

बंगळूर – कर्नाटकमध्ये दहा दिवस रंगलेल्या हाय-होल्टेज राजकीय नाट्याची अखेर आज अगदीच मिळमिळीत झाली. शक्तिपरीक्षेच्या आधी भाजपने राज्य विधानसभेतून सभात्याग केल्याने मुख्यमंत्री एच.डी.कुमारस्वामी यांनी कुठल्या लढतीविनाच विश्‍वासमत जिंकले. त्यामुळे त्या राज्यात आता जेडीएस-कॉंग्रेस आघाडीचे सरकार सत्तारूढ झाले आहे.

कुमारस्वामी यांनी बुधवारी भाजप विरोधकांच्या मेळाव्याचे स्वरूप आलेल्या सोहळ्यात मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर कुठल्याच एका पक्षाला बहुमत नसलेल्या त्रिशंकू विधानसभेत आज ते शक्तिपरीक्षेला सामोरे गेले. विधानसभेत विरोधी पक्षनेते आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी.एस.येडियुरप्पा यांनी जेडीएस-कॉंग्रेस आघाडीवर जोरदार टीकास्त्र सोडले. त्या पक्षांच्या हातमिळवणीचा उल्लेख त्यांनी अपवित्र आघाडी अशा शब्दांत केला. येडियुरप्पा यांचा शाब्दिक हल्लाबोल झाल्यानंतर भाजपचे सदस्य विधानसभेतून बाहेर पडले. भाजप सदस्यांच्या अनुपस्थितीत सभापती के.आर.रमेश कुमार यांनी कुमारस्वामींचा विश्‍वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूूर झाल्याचे जाहीर केले.

कर्नाटक विधानसभेचे एकूण संख्याबळ 224 इतके आहे. मात्र, विधानसभेची सध्याची सदस्यसंख्या 221 इतकीच आहे. त्यातील 117 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा जेडीएस-कॉंग्रेस आघाडीकडून करण्यात आला. जेडीएसचे 36 तर कॉंग्रेसचे 78 सदस्य आहेत. बसप आणि केपीजेपीच्या प्रत्येकी एक तसेच एका अपक्षाचा पाठिंबा असल्याचा दावाही आघाडीने केला. स्वत: कुमारस्वामी दोन विधानसभा मतदारसंघांमधून विजयी झाले आहेत. कुमारस्वामी यांनी मांडलेल्या विश्‍वासदर्शक ठरावाच्या पराभवासाठी 104 आमदार असणाऱ्या भाजपला आणखी 7 सदस्यांची गरज होती. मात्र, 19 मे यादिवसाप्रमाणेच भाजपने आजही लढत टाळली. त्यादिवशी बहुमत सिद्ध करण्यासाठी आवश्‍यक संख्याबळ नसल्याने येडियुरप्पा यांनी शक्‍तिपरीक्षेला सामोरे जाण्यापूर्वीच मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. तीन दिवसांपेक्षा कमी काळात ते पदावरून पायउतार झाल्याने कुमारस्वामी यांना संधी मिळाली.

कर्नाटक विधानसभा आठवडाभराच्या कालावधीत दोन विश्‍वासदर्शक ठरावांची साक्षीदार ठरली. पहिला ठराव येडियुरप्पांनी तर दुसरा कुमारस्वामींनी मांडला. दोन्ही वेळा नंबरगेममध्ये पीछेहाट होण्याची जाणीव झालेल्या भाजपने मतदानाला सामोरे जाण्याचे टाळले.

आज सभापतीपदाच्या निवडणुकीतून भाजपने सुरेशकुमार यांची उमेदवारी मागे घेतली. त्यावेळीच नंबरगेममध्ये पुन्हा पराभव होत असल्याची कबुली भाजपने एकाअर्थी दिली. कुमारस्वामी यांनी विश्‍वासमत जिंकल्याने जवळपास दहा दिवस स्वतंत्र रिसॉर्टमध्ये बंदिस्त असलेल्या जेडीएस आणि कॉंग्रेसच्या आमदारांनी एकाअर्थी घरी जाण्याचे स्वातंत्र्य अनुभवले. दरम्यान, मंत्रिपदांसाठी आणि महत्वाचे खाते मिळवण्यासाठी जेडीएस आणि कॉंग्रेसच्या आमदारांमध्ये जोरदार लॉबिंग सुरू झाले आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार कुमारस्वामींच्या दृष्टीने मोठेच आव्हान आणि तितकाच डोकेदुखीचा विषय ठरण्याची शक्‍यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button