कर्जाला कंटाळून कार्यकर्त्याची आत्महत्या

पुणे – गत महापालिका निवडणुकीत झालेल्या कर्जाच्या जाचाला कंटाळून सोमवारी सकाळी सलीम अली अभयारण्यात झाडाला गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केली. राजेश मनोज रॉय( वय 30 , रा. गणेशनगर, येरवडा), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. राजेश हा आंबेडकरी चळवळीतील युवा कार्यकर्ता म्हणून सक्रिय होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळा- मुठा नदी किनारी सलीम अली अभयारण्य आहे. दररोज सकाळी स्थानिक नागरिक अभयारण्यात मॉर्निग वॉकला जात असतात.
सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे नागरिक मॉर्निग वॉकला गेले असता एका झाडाला राजेशने ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यामुळे नागरिकांनी येरवडा पोलिसांना माहिती दिली. काही वेळाने पोलिसांनी घटनास्थळी आल्यावर मृतदेह झाडावरून खाली उतरविण्यात आला. राजेश हा आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता होता.त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. राजेश रॉय हा गेल्या वर्षी प्रभाग सहामधून महापालिका निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणुकीला उभा राहिला होता. निवडणुकीसाठी राजेशने सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले होते.पण निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. त्यानंतर सावकारांकडून कर्जाचा त्रास होत असल्याने कर्जाला कंटाळून राजेशने आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे, अशी माहिती सहायक निरीक्षक सुशील बोबडे यांनी दिली.