कमी किंमतीत घर देण्यास नकार दिल्याने कुटुंबावर कोयत्याने वार

दहा महिन्यांपूर्वी खरेदी केलेलं घर कमी किंमतीत देण्यास नकार दिल्याने कुटुंबावर धारदार शस्त्राने वार केल्याची घटनेने खळबळ उडाली आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये ही घटना घडली असून यामध्ये दहा वर्षीय मुलगी आणि तिची आई थोडक्यात बचावली आहे. तर, श्रीकांत सुर्वे हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी बबलू जोगदंडसह त्याची आई, बहीण आणि एक अनोळखी साथीदारावर वाकड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बबलू हा पिंपरी-चिंचवडमधील माथाडी संघटनेचा अध्यक्ष असल्याचे सुत्रांकडून कळते. दरम्यान, या कुटुंबावर झालेला हल्ला सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, जखमी श्रीकांत सुर्वे यांनी दहा महिन्यांपूर्वी घर खरेदी केलं होतं. तसेच त्यांचा एक गुंठ्यांचा मोकळा प्लॉट असून तो आरोपीला कमी किंमतीत हवा होता. मात्र, ते देण्यास श्रीकांत यांनी नकार दिल्याने आरोपी बबलू जोगदंड चिडला होता. या रागातून त्याने सोमवारी रात्री मुलीला खासगी शिकवणीवरून घरी घेऊन येत असताना श्रीकांत यांना अरेरावी करीत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली.
त्यानंतर त्यांच्यात वाद झाला, यावेळी आरोपी बबलूने श्रीकांत यांना पकडून मारण्याचा प्रयत्न केला असता ते आपल्या घराच्या दिशेने पळाले, त्यापाठोपाठ बबलू त्याची आई, बहीण आणि एक अनोळखी व्यक्तीही त्यांच्या मागे धावले, बबलूकडे सत्तूर आणि अनोळखी व्यक्तीकडे कोयता होता त्या दोघांनी श्रीकांत यांच्यावर वार केले तर त्यांच्या पत्नीला आणि मुलीला ढकलून दिले.
वारंवार धमक्या देत असल्याने आगोदरच सुर्वे कुटुंब हे बबलूला घाबरून राहात होते. त्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटलं आहे. याप्रकरणी वाकड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.