‘कचरा उचलण्यासाठी गाड्या वाढवा’

पिंपरी – निगडी प्राधिकरण, तसेच शहराच्या अन्य भागांत कचरा मोठ्या प्रमाणात साठू लागला असून, पावसाळ्यात ही समस्या तीव्र होईल. त्यामुळे प्रशासनाने कचरा उचलण्यासाठी गाड्या वाढवून रोजच्या रोज कचरा हलविण्याची तयारी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक राजू मिसाळ आणि शिवसेनेचे नगरसेवक अमित गावडे यांनी ही माहिती पत्रकारांना दिली. ते म्हणाले, ‘‘कचरा उचलण्याबाबतची निविदा प्रक्रिया मंजूर होण्यास काही महिने लागतील. दरम्यान, कचरा उचलण्यासाठी गाड्यांची संख्या कमी झाल्याने कचरा साठण्यास सुरवात झाली आहे. त्यामुळे कचरा उचलण्यासाठी महापालिकेने तातडीने उपाय योजावेत.’’ अमृत योजनेअंतर्गत पाणीपुरवठा विभागाची २४ बाय ७ योजनेसाठी शहरातील अनेक भागांत रस्ते खोदले आहेत. काही ठिकाणी कामेही थांबली आहेत. हे खड्डे तातडीने बुजवून घ्यावेत आणि पावसाळ्यानंतर कामे करावीत, अशी मागणी आयुक्तांकडे केल्याची मिसाळ यांनी सांगितले.