breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

औषधनिर्माणशास्त्र अभियांत्रिकीच्या वळणावर

४० संस्थांचे नव्या महाविद्यालयांसाठी अर्ज

विद्यार्थ्यांच्या शोधात दम तोडलेल्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पावलावर पाऊल टाकत औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांची वाटचाल सुरू झाली आहे. यंदा औषधनिर्माणशास्त्र पदवी आणि पदविका अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी सरकारकडे ४० अर्ज आले आहेत.

मागेल त्याला महाविद्यालय असे धोरण ठेवत अगदी गल्लोगल्ली अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू झाल्यानंतर दशकभरातच या महाविद्यालयांची अवस्था बिकट झाली. गरजेपेक्षा जास्त झालेली महाविद्यालये, त्याचवेळी नोकरीची अपेक्षित संधी मिळत नसल्यामुळे घटलेली विद्यार्थीसंख्या यामुळे ही महाविद्यालये ओस पडली. दरम्यान, महागलेले वैद्यकीय अभ्यासक्रम आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील घटलेले रोजगार यामुळे विद्यार्थ्यांचा मोठा गट औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकडे वळला आहे. गेल्या दोन वर्षांपासून या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची मागणी वाढली आहे. त्यासाठी अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या उभारणीसाठी कोटय़वधी रुपये गुंतवलेले संस्थाचालक आहे ती जागा वापरून औषधनिर्माणशास्त्राची महाविद्यालये सुरू करत आहेत. यंदा ४० संस्थांनी महाविद्यालयासाठी अर्ज केले आहेत. या महाविद्यालयांना परवानगी मिळाल्यास जवळपास ३ ते ४ हजारांनी प्रवेश क्षमता वाढण्याची शक्यता आहे.

काही वर्षांपूर्वी अभियांत्रिकी महाविद्यालयांना सरसकट परवानगी देण्यात येत होती. त्याचप्रमाणे आता औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालयांना परवानगी देण्यात येत आहे. गेल्यावर्षी (२०१८-१९) पदवी आणि पदविका अभ्यासक्रमाच्या ४४ महाविद्यालयांना परवानगी देण्यात आली होती. त्यापूर्वी म्हणजेच शैक्षणिक वर्ष २०१७ -१८ मध्ये ४० संस्थांना नव्याने परवानगी देण्यात आली.

नोकरीच्या संधी कमी : एकीकडे प्रवेश क्षमता आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद वाढत असताना नोकरीच्या संधीमध्ये मात्र वाढ झालेली दिसत नाही. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेच्या आकडेवारीनुसार पदवी किंवा पदविका घेतलेल्या विद्यार्थ्यांपैकी साधारण ३० टक्केच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाल्याचे दिसते. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षांत २७ हजार ३८७ प्रवेश क्षमता होती. यावर्षी १६ हजार ३१३ विद्यार्थ्यांनी पदवी किंवा पदविका घेतली. त्यापैकी ४ हजार ९०७ विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली. गेल्यावर्षी (२०१७-१८) ३१ हजार ४९३ प्रवेश क्षमता होती. नोकरीची संधी मिळू शकलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३ हजार ७१८ होती.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button