ओबीसींच्या नाराजीमुळे भाजपचा पराभव

- योगींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याचे विश्लेषण
बलिया – उत्तरप्रदेशात भाजपने ओबीसी नेते केशव प्रसाद मौर्य यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेची निवडणूक लढवली. पण नंतर त्यांना डावलून योगींना मुख्यमंत्री करण्यात आले. त्यामुळे राज्यातील ओबीसी समाज भाजपवर नाराज झाला असून त्यामुळेच पोटनिवडणुकांमध्ये भाजपला पराभव स्वीकारावा लागला आहे असे प्रतिपादन योगींच्या मंत्रिमंडळातील एक मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी केले आहे. ते कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
या पराभवाला योगी अदित्यनाथ हे जबाबदार आहेत काय? असे विचारता ते म्हणाली की भाजप सरकार या पराभवला जबाबदार आहे. या पराभवामागची कारणे शोधून भाजपने आत्मचिंतन केले पाहिजे. योगी की केशव यांच्यापैकी कोणाला मुख्यमंत्री करायचे याचा निर्णय पक्षाने करायचा होता. त्यांनी तो केला त्याचे परिणाम पक्षाने भोगले असे ते म्हणाले.
नुकत्याच झालेल्या पोट निवडणूकीत कैरानातील लोकसभेची आणि नूरपुर मधील विधानसभेची जागा भाजपने गमावली आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय हवा बदलली असून भाजपच्या गोटात नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. ओमप्रकाश राजभर हे सुहेल देव भारतीय समाज पक्ष या पक्षाचे अध्यक्ष आहेत. हा पक्ष एनडीए आघाडीतील घटक पक्ष आहे.