ऑफिसर ऑफ द मंथचा ठराव अधिका-यांनी लाथाडला?

- अडीच महिन्यानंतर केवळ एक अर्ज
पिंपरी- महापालिका प्रशासनातील कर्तव्यदक्ष अधिका-यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी अधिका-यांना ऑफिसर ऑफ द मंथ हा पुरस्कार देण्याचा ठराव अडीच महिन्यापूर्वी स्थायी समितीमध्ये केला होता. मात्र, या पुरस्कारासाठी एकमेव अर्ज आला असून मोठ्या कौतुकाने स्थायीत केलेला ठराव अधिका-यांनी चक्क लाथाडला आहे.
महापालिकेच्या मधुकर पवळे सभागृहामध्ये स्थायी समितीची बैठक बुधवारी (दि. 6) झाली. या सभेमध्ये समितीच्या सदस्यांनी या ठरावाबद्दल माहिती घेतली. त्यावर आतापर्यंत एका अधिकाऱ्याचे म्हणजेच सह आयुक्त दिलीप गावडे यांचा एकमेव अर्ज आला आहे. ठरावातील जाचक अटी-शर्तींमुळे अधिकारी अर्ज करत नसल्याचे स्पष्टीकरण स्थायी समिती सदस्य विलास मडिगेरी यांनी दिले आहे. त्यासाठी ठरावातील अटीशर्ती शितील करण्याच्या सूचना प्रशासनाला केल्या आहेत. अन्यथा ठराव रद्द करण्याची नामुष्की ओढावेल, अशीही चिंता मडिगेरी यांनी व्यक्त केली आहे.
यापूर्वी आफीसर आफ द मंथ पुरस्कारासाठी चांगल्या अधिकाऱ्यांची निवड ही आयुक्ताकडून केली जात होती. मात्र, आफीसर आफ द मंथ पुरस्कारासाठी अधिका-यांनी आपली शिफारस स्वतःच करायची आहे. त्यासाठी अर्ज करावयाचा आहे. मात्र, कोणताही अधिकारी स्वतःहून अर्ज भरण्यासाठी पुढे येत नाही. आयुक्तांनीच किंवा वरीष्ठ अधिकाऱ्यांनी चांगल्या अधिकाऱ्यांची पुरस्कारासाठी निवड करण्याची गरज आहे, अशी अपेक्षा काही अधिका-यांनी चर्चा करताना व्यक्त केली.