ऑनलाईन संस्था नोंदणीविरोधात वकिलांचे आंदोलन तुर्त रद्द

- धर्मादाय आयुक्त- वकिलांमध्ये उद्या होणार चर्चा
पुणे – धर्मादाय संस्था नोंदणीचे प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने दाखल करण्याच्याविरोधात वकिलांकडून करण्यत येणारे आंदोलन बुधवारपर्यंत (दि.30) स्थगित करण्यात आले आहे. तोपर्यंत वकिलांना पूर्वीप्रमाणेच संस्थाची नोंदणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. बुधवारी राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे पुण्यात येणार आहे. त्यावेळी वकील आणि त्यांच्यात चर्चा होऊन पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी यापुढे केवळ ऑनलाईन पध्दतीनेच धर्मादाय संस्थांची नोंदणी करता येईल, असा आदेश नुकताच जारी केला आहे. पुण्यातील न्यास नोंदणी कार्यालयातील पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनने हा कार्यालयीन आदेश तातडीने रद्द करण्याची मागणी केली आहे. पूर्वीप्रमाणे संस्था नोंदणीच्या फाईल दाखल करून घेण्यात याव्यात, असे असोसिएशनचे म्हणणे आहे. हा कार्यालयीन आदेश तातडीने रद्द न झाल्यास येत्या सोमवारपासून बेमुदत आंदोलन करण्यात येणार होते. मात्र, सोमवारी सह धर्मादाय आयुक्त एस. बी. कचरे यांनी वकिलांना 30 मेपर्यंत पूर्वीप्रमाणे संस्था नोंदणीस परवानगी दिली आहे. त्यामुळे हे आंदोलन दि. 30 मेपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. याचदिवशी डिगे यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.