ऐन उन्हाळ्यात स्वाईन फ्लूने डोके वर काढले

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरात “स्वाइन फ्लू’ने पुन्हा डोके वर काढले आहे. “स्वाईन फ्लू’ने एक रुग्ण बाधित व एक संशयित आढळला आहे. या रुग्णांवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गेल्या महिन्याभरात “स्वाईन फ्लू’ हा भयावह आजाराचा प्रादुर्भाव सतत वाढत आहे. “स्वाईन फ्लू’चे गेल्या चार महिन्यात शहरातमध्ये 16 बाधित रुग्ण आढळले असून दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच, गेल्या दोन महिन्यात राज्यभरात स्वाईन फ्लू’च्या आजाराने 121 नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
सततच्या बदलत्या वातावरणामुळे स्वाईन फ्लूचा आजार बळावत असल्याचे दिसत आहे. या आजाराला आटोक्यात आणण्यासाठी महापालिका विविध उपाययोजना करत असल्याचे, आरोग्य विभागाने सांगितले आहे. यासाठी महापालिका रुग्णालयात मोफत टॅमी फ्लू गोळ्या व लसीकरण केले जात आहे. स्वाईन फ्लू या आजाराला आळा घालण्यासाठी महापालिका दवाखाने व रूग्णालयांमार्फत जनजागृती केली जात आहे. नागरिकांनी “स्वाईन फ्लू’ची लक्षणे दिसताच त्वरित उपचारासाठी डॉक्टरकडे जावे. तसेच, नागरिकांनीही या आजाराबाबत दक्षता घेण्याचे, आवाहन वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे