एसटी भाडेवाढ अटळ – दिवाकर रावते

- एसटी कर्मचाऱ्यांना 4 हजार 849 कोटींची वेतनवाढ
- वेतनवाढ मान्य नसणाऱ्यांसाठी “सुवर्णसंधी’ योजना
मुंबई – डिझेलच्या दरांत प्रचंड मोठी वाढ झाल्याने एसटीची भाडेवाढ अटळ आहे. डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळावर 2 हजार कोटी रूपयांचा वर्षाला बोजा पडत आहे. मात्र, ग्राहकांवर भाववाढीचा बोजा पडू नये म्हणून 15 जूनपर्यंत थांबणार आहोत, पण भाववाढ होणारच असे संकेत देतानाच परिवहनमंत्री तथा महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी आज एसटी कर्मचाऱ्यांना 4 हजार 849 कोटी रूपयांची वेतनवाढ घोषित केली.
एसटी महामंडळाच्या 70 व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमिवर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित पत्रकारपरिषदेत एसटी कर्मचाऱ्यांना 4 हजार 849 कोटी रूपयांची वेतनवाढ घोषित केली. याचा लाभ 47 हजार ते 50 हजार कर्मचाऱ्यांना होणार आहे. एसटी महामंडळाच्या आजपर्यंतच्या वेतनवाढी एकत्रित केल्या तरी होणार नाही इतकी मोठी वेतनवाढ आपण देत असल्याचे रावते म्हणाले.
ही वेतनवाढ ज्या कर्मचाऱ्यांना मान्य नाही त्यांच्यासाठी महामंडळाने “सुवर्णसंधी’ योजनाही जाहीर केली असून अशा कर्मचाऱ्यांना राजीनामा देऊन प्रतिमहिना 20 हजार पगारावर पाच वर्षांसाठी कंत्राटी नोकरी दिली जाणार असल्याचेही रावते यांनी जाहिर केले.
डिझेल दरवाढीमुळे एसटी महामंडळावर 2 हजार कोटी रूपयांचा वर्षाला बोजा पडत आहे. यामुळे 30 टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. आपण याचा विचार करत आहोत. मात्र अनेक जण आता गावी गेले आहेत. त्यांच्यावर भाववाढीचा बोजा पडू नये म्हणून 15 जूनपर्यंत तरी भाववाढ होणार नसल्याचे सूतोवाचही रावते यांनी केले. मात्र, भाववाढ होणारच असेही ते म्हणाले.
काय आहे “सुवर्णसंधी’ योजना
कर्मचाऱ्यांना 7 जूनपर्यंत वेतनवाढीच्या संमतीपत्रावर सही करावी लागणार आहे. ज्या कर्मचाऱ्यांना ही वेतनवाढ मान्य नसेल त्यांच्यासाठी महामंडळाने सुवर्णसंधी योजना आणली आहे. अशा कर्मचाऱ्यांना राजीनामा द्यावा लागेल. त्यानंतर चालकाकरिता 20 हजार रूपये दरमहा व वाहकाकरिता 19 हजार रूपये दरमहा असा पगार मिळेल. त्यात वार्षिक 200 रूपये वाढ होईल. कंत्राटी पद्धतीचा हा करार पाच वर्षांसाठी असेल. पाच वर्षांनंतर त्याची सर्व्हिस पाहून करार वाढविण्यासंदर्भातील निर्णय घेण्यात येणार असल्याचे रावते यांनी सांगितले.
भत्त्यांतही घसघशीत वाढ
कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमध्येही वाढ करण्यात आली आहे. हजेरी प्रोत्साहन भत्ता 180 रूपये होता तो आता 1 हजार 200 रूपये करण्यात आला आहे. धुलाई भत्त्यातही घसघशीत वाढ करण्यात आली आहे. सुती गणवेशासाठी 50 रूपयावरून 100 रूपये, वूलन गणवेशासाठी 18 रूपयावरून 100 रूपये, रात्रपाळी भत्ता 11 वरून 35 रूपये अशी वाढ करण्यात आल्याचे दिवाकर रावते म्हणाले.